Monday, 4 September 2023

विद्यार्थी देशाचे आदर्श खेळाडू आणि समाजातील जबाबदार नागरिक व्हावेत - कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 कोल्हापूर, दि.04 सप्टेंबर - विद्यापीठातील बी.ए.स्पोर्टस् या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी देशाचे आदर्श खेळाडू आणि समाजातील जबाबदार नागरिक व्हावेत.विद्यार्थ्यांना एका पेक्षा जास्त खेळामध्ये पारंगत होण्याची संधी या माध्यमातून निर्माण झालेली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

 

            शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत यावर्षापासून नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या बी.ए.स्पोर्टस् या पदवी अभ्यासक्रमाच्या उद्धाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते.कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामध्ये करण्यात आलेे.याप्रसंगी, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कुलगुरू डॉ.शिर्के पुढे बोलताना म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत.फक्त खेळाडू, प्रशिक्षक, संघटक म्हणून मर्यादीत राहता या पलीकडे जाऊन स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट, स्पोर्टस् जर्नालिझम, स्पोर्टस् फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट मॅनेजमेंंट, स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर, जिम इंस्ट्रक्टर ॲथलीट मॅनेजर यांसह अनेक संधी क्रीडा क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवून देशाचे नांव उज्वल करावेे.संलग्नित महाविद्यालयांनी तालुका पातळीवर हा अभ्यासक्रम राबविल्यास त्यांना निश्चित प्रोत्साहन मिळेल.

 

बी.ए.स्पोर्टस् या तीन वर्ष कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होण्याचे भाग्य या प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभलेले आहे. या ठिकाणी उत्कृष्ठ मार्गदर्शकांची टिम अभ्यासक्रमातील खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.विद्यापीठ विद्यार्थी केंद्रीत योजना आणि अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळामध्ये करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.  विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत संलग्नित महाविद्यालयातील आणि ग्रामीण दूर्गम भागातील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन आणि दिशा देण्याचे कार्य झालेले आहे.तसेच, या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्ये उंचावण्याची संधी प्राप्त झालेली आहे.क्रीडा विषयक योग्य माहिती अभ्यासक्रम आत्मसात करून विद्यापीठाच्या लौकिकामध्ये विद्यार्थींनी भर घालावे. विद्यापीठ परिसरामध्ये खेळाडूंना आपला खेळ उंचावण्यासाठी चांगले वातावरण आहे. येथील आवश्यक त्या सोयी-सुविधांचा योग्य उपयोग करून परिश्रमपूर्वक अभ्यासक्र पूर्ण करून आयुष्याची दिशा निश्चित करावी.

            या अभ्यासक्रमामध्ये आंतरराज्य खेळाडूही सहभागी झालेले आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी केले.तर विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी सुचय खोपडे, ॲथलेटिक्सचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक सुभाष पवार यांचेसह विद्यार्थी, शिक्षक, क्रीडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment