Tuesday 11 April 2023

संविधानिक मूल्ये, लोकशाही शिक्षण व ज्ञान यांच्या आधारेच

फुले-आंबेडकरांना अभिप्रेत भारताची संकल्पना साकारणे शक्य

 शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'फुले, आंबेडकरांची भारतविषयक संकल्पना' या परिसंवादात बोलताना डॉ. भारती पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. अरूण शिंदे, टेकचंद सोनवणे, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. दीपा श्रावस्ती.



कोल्हापूर, दि. ११ एप्रिल: संविधानिक मूल्ये, लोकशाही शिक्षण आणि ज्ञान या त्रिसूत्रीच्या आधारे माणसाचे जगणे सुंदर बनविण्याचे ध्येय बाळगणे म्हणजेच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारताची संकल्पना साकारणे होय, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांची भारतविषयक संकल्पना या परिसंवादात उमटला.

विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने कालपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहास प्रारंभ झाला. आज महात्मा फुले जयंतीनिमित्त या सप्ताहात विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या परिसंवादात विद्यापीठाच्या शारदाबाई पवार अध्यासनाच्या संचालक डॉ. भारती पाटील, सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक डॉ. अरूण शिंदे आणि पुण्याचे वरिष्ठ पत्रकार टेकचंद सोनावणे हे सहभागी झाले. केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भारती पाटील यांनी आपल्या मांडणीमध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात सुरू झालेल्या भारताची संकल्पना ते नवभारताची संकल्पना या प्रवासाचा अतिशय तपशीलवार आढावा घेतला. त्या म्हणाल्या, भारताच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेचे समाजवादी, धर्मनिरपेक्ष मार्गाने प्रस्थापन अभिप्रेत होते. त्या दिशेने आपण ५० वर्षे प्रवास केलाही. नवभारताच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये भारतीयांचा सहभाग आणि उत्तरदायित्व बाळगणारे सरकार अभिप्रेत आहे. नवकल्पना, मेहनत आणि सृजनशीलता ही या संकल्पनेची वैशिष्ट्ये आहेत. त्याद्वारे शांतता, एकात्मता व बंधुभाव यांची प्रस्थापना अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा आणि अस्वच्छता यांपासून मुक्तताही हवी आहे. तथापि, जागतिकीकरणाच्या कालखंडात धर्म, वर्गांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होऊन सामाजिक-आर्थिक दरी वाढते आहे. ती वाढू न देण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, नेहरू, गांधी यांची भारताची संकल्पना समजून घेणे आणि सातत्याने मांडत राहणे फार महत्त्वाचे आहे.

डॉ. अरूण शिंदे यांनी महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा भारत मांडताना सांगितले की, भारत हा बळीस्थान- अर्थात बळीचा, शेतकरी, कष्टकऱ्यांचा देश आहे, अशी फुले यांनी मांडणी केली. स्त्री, शूद्रातिशूद्रांच्या लोककल्याणकारी राज्याची कल्पना त्यांनी केली होती. ज्या देशात स्त्री, शूद्रातिशूद्र, शेतकरी कष्टकरी ज्या स्थितीत असतात, ती त्या देशाची स्थिती असते, असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांच्या उत्थानाच्या दिशेने त्यांनी आपले जीवितकार्य केंद्रित केले होते. स्त्री-पुरूष समतेचा पुरस्कार त्यांनी केला. सामाजिक-नैतिक भावनेवर आधारित देशाचे स्वप्न ते पाहात होते. शिक्षण हा या सर्वांमागील कळीचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोगाचे नसून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त समाजरचना असणारा भारत फुले यांना अभिप्रेत होता.

टेकचंद सोनावणे यांनी विविध उदाहरणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर विषद केली. ते म्हणाले, समाजाच्या अस्पृश्य, वंचित घटकांच्या नैसर्गिक हक्कांवर बंधने आणणाऱ्या व्यवस्थांशी झगडा मांडणाऱ्या बाबासाहेबांनी सामाजिक-आर्थिक समानता प्रस्थापनेचे ध्येय बाळगले होते. त्यांच्या राष्ट्रसंकल्पनेत प्रेम, ममत्व, वात्सल्य आणि करुणा या माध्यमातून माणूसपण विकसित करण्यास जसे महत्त्व होते, तसेच सांविधानिक मूल्ये आणि लोकशाही शिक्षणालाही प्रचंड महत्त्व आहे. मात्र, नेमके त्या बाबतीत आपण अद्याप मोठा पल्ला गाठावयाचा आहे. भारताची राज्यघटना हे सर्वाधिक ताकदवान साधन भारतीय नागरिकांच्या हाती आहे. त्याहून कोणीही आणि काहीही मोठे नाही. असे असतानाही त्याचा वापर आपणास करता येत नाही. त्या दृष्टीने आपण स्वतःला तयार करायला हवे. देशाप्रती मूलभूत संवेदनशीलता निर्माण झाली की त्यापाठोपाठ उत्तरदायित्वाची भावनाही विकसित होईल. ज्ञान, नैतिक आचरण आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन ही त्रिसूत्री म्हणजे बाबासाहेबांच्या भारताची संकल्पना आहे.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, आधुनिकता ही काळावर नव्हे, तर विचार व कार्य प्रक्रियेवर अवलंबून असते. बुद्ध, महावीर यांचे विचारकार्य अडीच हजार वर्षांनंतरही आधुनिक व प्रस्तुत असते. आपण मात्र दिखावटी आधुनिकतेच्या प्रेमात असतो. त्यामुळे प्रगल्भ नागरिक घडल्याखेरीज फुले-आंबेडकरांच्या भारताची संकल्पना प्रत्यक्षात येणार नाही. त्यासाठी शिक्षणाच्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक विचार हवा. लोकशाही शिक्षण हे व्यक्तीगत पातळीवर मर्यादित न राहता कौटुंबिक व सामाजिक स्तरावर विस्तारणे आवश्यक आहे. फुले-आंबेडकरांचा स्त्रीविषयक प्रागतिक दृष्टीकोन अनुसरणेही गरजेचे आहे. ही माणूस बनण्याची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. त्यापुढे मग व्यक्ती, समाज आणि देश या क्रमाने राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते.

यावेळी डॉ. दीपा श्रावस्ती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment