Thursday 7 March 2024

विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे जीवनकार्य समजून घ्यावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

राजर्षी शाहूंच्या कार्यावर आधारित चित्ररथाचे विद्यापीठात स्वागत

छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील चित्ररथाचे शिवाजी विद्यापीठ प्रांगणात आगमन होताच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी रथावरील भव्य शाहूप्रतिमेच्या पायी पुष्प वाहून स्वागत केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. रामचंद्र पवार आदी उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील चित्ररथासमवेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी.


(छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील चित्ररथाची लघु-चित्रफीत)


कोल्हापूर, दि. ७ मार्च: विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी प्रेरित व्हावे, हेच त्यांच्याविषयीच्या चित्ररथाचे खरे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. आज या चित्ररथाचे स्वागत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांशी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, कला, संस्कृती आदी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कार्याचा डोंगर उभा केला आहे. कोल्हापूरचे ते खरे भाग्यविधाते आहेत. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात नावाजले जाते. या चित्ररथावर त्यांच्या कार्याची काही क्षणचित्रे पाहावयास मिळतात. पण, त्याही पलिकडे त्यांचे कार्य आहे. ते या निमित्ताने विद्यार्थ्यांनी जाणून घेणे अभिप्रेत आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या ग्रंथालयातील राजर्षींविषयीच्या पुस्तकांचे वाचन करावे. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. सोमनाथ पवार आदी उपस्थित होते. आज संपूर्ण दिवसभर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांनी, अभ्यागतांनी या चित्ररथावरील प्रदर्शनाची पाहणी केली. त्याच्यासमवेत छायाचित्रे काढली आणि राजर्षींच्या कार्याला उजाळा देऊन अभिवादन केले.

No comments:

Post a Comment