भव्य कीटक प्रदर्शनाचे विद्यापीठात उद्घाटन; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाची कुतुहलाने पाहणी करणाऱ्या विद्यार्थिनी |
शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाची डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित भव्य कीटक प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. |
कोल्हापूर, दि. १३ मार्च: जैविक अन्नसाखळीमध्ये
कीटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कीटकांच्या प्रदर्शनाच्या आयोजनामुळे विद्यापीठाच्या
नॉलेज टुरिझममध्ये प्राणीशास्त्र अधिविभागाने महत्त्वाची भर घातली आहे, असे मत कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या
प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय भव्य कीटक
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी
विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.
प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे विविध
संशोधनांतर्गत वेळोवेळी वेगवेगळ्या कीटकांच्या प्रजातींचे नमुने वन विभाग आणि
महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या सौजन्याने संकलित करण्यात आले आहेत. हे नमुने
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम रितीने जतन करून ठेवण्यात आले आहेत. यातीलच
निवडक २२०० कीटकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरांसह काटीकीडे,
टोळ, नाकतोडे, भुंगे, मक्षिका, चतुर, किरकिरे, प्रार्थना कीटक, झुरळ आदी
कीटकांच्या विविध प्रजाती व प्रकार पाहता येणार आहेत. त्याखेरीज सर्वात मोठा पतंग,
भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू तसेच ब्लू मॉरमॉन हे राज्य
फुलपाखरू पाहण्याची संधीही मिळणार आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आपल्या
सभोवताली कीटकांच्या अनेक प्रजाती वावरत असतात. त्या प्रत्येक प्रजातीचे
अन्नसाखळीमध्ये फार महत्त्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये कीटक मोलाची
भूमिका बजावतात. त्यामुळे ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व कीटकांच्या बाबतीत मानवाने अवलंबले पाहिजे. कीटकांचे अस्तित्व
राहिले, तरच मानवाचे अस्तित्व अबाधित राहणार आहे, याची जाणीव करून देणारे हे
प्रदर्शन आहे. संशोधक, विद्यार्थी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य
नागरिक यांच्यापर्यंत हा मोलाचा संदेश घेऊन जाण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन
महत्त्वाची भूमिका बजावेल. प्राणीशास्त्र अधिविभागाने हे प्रदर्शन कायमस्वरुपी उपलब्ध
करण्याच्या दृष्टीनेही आवर्जून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. सुनील
गायकवाड यांनी कुलगुरूंसह मान्यवरांना प्रदर्शनात मांडलेल्या कीटकांच्या
प्रजातींची तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले, पृथ्वीवरील एकूण प्राणीमात्रांमध्ये
कीटकांचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. कीटकांच्या अंदाजे एक कोटी प्रजाती असून
त्यातील अवघ्या दहा लाखच मानवाला माहिती आहेत. एका माणसामागे २०० दशलक्ष कीटक असे
त्यांच्या संख्येचे प्रमाण आहे. डायनासॉरच्या आधीपासून पृथ्वीवर कीटकांचे अस्तित्व
आहे. एटलास मॉथ हा सर्वात मोठा कीटक असून तो या प्रदर्शनात मांडला आहे. या
कीटकांची म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत. एक मधमाशी एका दिवसात किमान १००० फुलांना
भेट देते. प्रवासी टोळ हा एका खंडापासून दुसऱ्या खंडापर्यंतचा पल्ला पार करू शकतो.
सिकॅडा हा कीटक १७ वर्षांपर्यंत जगू शकतो. कुंभार माशीकडे अन्न जतन करून ठेवण्याची
आणि दुसऱ्या कीटकास बेशुद्ध करण्याची कला असते. प्रार्थना कीटक मीलनोपरांत नरास
खाऊन टाकून आपल्या अंड्यांसाठीच्या प्रथिनांची गरज भागविते.
‘मधमाशी संपल्यास माणूस
केवळ चार वर्षे जगेल’
यावेळी डॉ. गायकवाड यांनी महान शास्त्रज्ञ
अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या एका विधानात मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित
केले. आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, ‘ज्यावेळी या पृथ्वीवरील
अखेरची मधमाशी नाहीशी होईल, तेथून पुढे माणूस केवळ चार वर्षे जगू शकेल.’ परागीभवनाच्या प्रक्रियेमुळे अन्ननिर्मितीमध्ये मधमाशा अत्यंत मोलाची
भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी मधमाशीचे अस्तित्व उपयुक्त आहे.
अशाच प्रकारे प्रत्येक कीटक आपल्या अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, हे
लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण
महाजन, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज
कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.बी. खरबडे, व्यवस्थापन परिषद सदस्य
सिद्धार्थ शिंदे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ.
नितीन कांबळे, डॉ. शिवानंद यन्कंची, डॉ. माधव भिलावे उपस्थित होते. सुरवातीला डॉ.
माधुरी वाळवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष
देशमुख यांनी आभार मानले.
कीटकांना पाहून आश्चर्य
आणि नवलाई
प्रदर्शन पाहताना विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या
आश्चर्य आणि नवलाई ओसंडून वाहात होती. प्राणीशास्त्र अधिविभागाने आपल्या संशोधक
विद्यार्थी-विद्यार्थिनींची माहिती देण्यासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे
कीटकांच्या प्रत्येक पॅनलभोवती जिज्ञासूंची गर्दी दिसत होती. आपल्याला माहिती
असणाऱ्या मोजक्या कीटकांकडे कौतुकाने पाहताना माहिती नसणाऱ्या कीटकांकडेही चिकित्सक
नवलाईच्या दृष्टीने पाहणारे प्रेक्षक दिसून येत होते.
No comments:
Post a Comment