Wednesday 6 March 2024

'पद्मश्री' डॉ. प्रतापसिंह जाधव यांना

प्राचार्य रा.कृ. कणबरकर-२०२४ पुरस्कार जाहीर

 

'पद्मश्री' डॉ. प्रतापसिंह जाधव

शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्काराची घोषणा करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के (लघु-चित्रफीत)


 

कोल्हापूर, दि. ६ मार्च: शिवाजी विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार यंदा पद्मश्री डॉ. प्रतापसिंह गणपतराव जाधव यांना जाहीर करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिंगबर शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा.कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्काराच्या शोध समितीने सन २०२४च्या पुरस्कारासाठी डॉ. जाधव यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांची एकमताने निवड केली आहे. शिवाजी विद्यापीठाशी त्यांचे शैक्षणिक ऋणानुबंध हे पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांच्यापासून असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरणाची तारीख आणि प्रमुख अतिथींचे नाव लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सन २०१६ पासून हा पुरस्कार भारतरत्न प्रा. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था, सातारा (२०१७), डॉ. जब्बार पटेल (२०१८), प्रा. एन.डी. पाटील (२०१९), डॉ. डी.वाय. पाटील (२०२२) आणि डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम (२०२३) यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, कणबरकर पुरस्कार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक डॉ. सागर डेळेकर, एसयूके-आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत, मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment