शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात. मंचावर ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानमालेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार. मंचावर डॉ. यशवंतराव थोरात. |
कोल्हापूर, दि. २ मार्च: दक्षिण आशियामध्ये आपल्या वर्चस्ववादासाठी भारत आणि पाकिस्तानचा वापर करणारे खरे खेळाडू अमेरिका आणि चीन आहेत, याची जाणीव राखून या देशांनी वेळीच सावध व्हायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र
अधिविभागाच्या वतीने ‘भारत-पाकिस्तान संबंध’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या
दोनदिवसीय विशेष व्याख्यानमालेमध्ये आज दुसरे व अंतिम पुष्प गुंफताना ते बोलत
होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार होते.
‘स्वातंत्र्योत्तर पाकिस्तानची कहाणी’ या विषयाच्या अनुषंगाने
फाळणीनंतर स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानच्या वाटचालीचा
सविस्तर वेध डॉ. थोरात यांनी घेतला. ते म्हणाले, दक्षिण आशियामध्ये आपण पाच
ट्रिलियनची महासत्ता म्हणून आगेकूच करीत असलो आणि या विभागामध्ये आपणच अग्रेसर
असल्यासारखे वाटत असले तरी तो निव्वळ आभास आहे. या विभागातील सत्तास्पर्धा ही भारत
आणि पाकिस्तानमधली नसून अमेरिका आणि चीन यांच्यामधली आहे. सन २००६मध्ये अमेरिका
आणि भारत यांच्यामध्ये सहकार्य करार झाल्यानंतर चीनने पाकिस्तानशी संबंध वाढविले.
आपले आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारणातील स्थान वाढविण्यासाठी या महासत्ता या
दोन देशांचा वापर करीत आहेत. चीनला अमेरिकेपेक्षा बलाढ्य व्हायचे आहे आणि
अमेरिकेला त्यांना रोखायचे आहे, असा हा चेक्स अँड बॅलन्सेसचा खेळ आहे. या
पार्श्वभूमीवर, आपल्या विभागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा निर्धार आपणच
घ्यावयाचा आहे. या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य प्रस्थापित न झाल्यास असे बाह्यघटक
त्याचा फायदा उठवित राहणार आणि त्यातून दहशतवादालाच खतपाणी मिळत राहणार, असे
त्यांनी सांगितले.
गेल्या ७५ वर्षांतील
पाकिस्तानच्या वाटचालीवर प्रकाश टाकताना डॉ. थोरात म्हणाले, केवळ इस्लामिक
राष्ट्रवादावर देशाची उभारणी करू नका, असा सल्ला डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी महंमद
अली जिना यांना पत्र पाठवून दिला होता. मात्र, त्यांनी ते ऐकले नाही आणि त्याची
परिणती पुढे बांगलादेशच्या निर्मितीमध्ये झाली. स्वातंत्र्याच्या संदर्भात
बोलावयाचे झाल्यास भारताला ब्रिटीशांपासून ते हवे होते, तर पाकिस्तानला ब्रिटीश
आणि हिंदुबहुलांकडूनही स्वातंत्र्य हवे होते. भारताशी संबंधांच्या बाबतीत
पाकिस्तान कधीही फारसा संतुष्ट नव्हता. तशात ब्रिटीशांनी जिना यांना मुस्लीमबहुल
प्रांत देण्याचे मान्य केले होते. त्या बाबतीत आग्रही राहताना दोन वेळा पाकिस्तानचा
भूगोल बदलून घेतला. वाट्याला आलेला हा भूगोलही त्यांच्या वर्तनामुळे त्यांना
एकत्रित राखता आला नाही. पश्चिम पंजाबी मुसलमानांमधील वरिष्ठत्वाच्या भावनेने
पाकिस्तानला एक होण्यापासून सातत्याने रोखले. पाकिस्तानमध्ये केवळ मुस्लीम आणि
मुस्लीमेतर हा भेद एका बाजूलाच राहिला आणि मुस्लीमांमध्येच शिया, सुन्नी, अहमदिया
असे एक ना अनेक सामाजिक भेद निर्माण करण्यात आले. वायव्य प्रांताकडील बलुच,
पश्तून, सराईकी, अफगाण आदी जमातींना सामावून घेण्यात आणि त्यांची संस्कृती समजून
घेण्यातही या पश्चिमी पंजाबींना अपयश आले. त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न अंगलट
आला. त्याखेरीज पाकिस्तानला प्रागतिक मार्गावर नेण्याची क्षमता असलेल्या जिना
यांचा राष्ट्रनिर्मितीनंतर अवघ्या १३ महिन्यांत मृत्यू झाला. तेव्हापासून पाकिस्तानात
नेतृत्वाचा संघर्ष कायम राहिला. वीस पंतप्रधान झाले, पण एकही आपला कार्यकाळ पूर्ण
करू शकला नाही. लष्कर आणि शासन यांच्यातील संघर्षामध्ये लष्कराचाच वरचष्मा कायम
राहिला. लष्कर हाच पाकिस्तानातील प्रभावी राजकीय खेळाडू आहे. पाकिस्तानला राज्यघटनेची
निर्मितीही योग्य प्रकारे करता आली नाही. अवघ्या तीन प्रश्नांवर तीन वर्षे चर्चा
चालली. त्यातून पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र असेल, पाकिस्तान सार्वभौम असेल आणि
पाकिस्तान लोकशाहीवादी असेल, अशी तीन फलिते निघाली. मात्र, म्हणजे नेमके काय, याची
उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे या तिन्ही बाबींची प्रस्थापना तेथे खऱ्या
अर्थाने कधीही होऊ शकली नाही. त्याचेच परिणाम पाकिस्तान आज भोगतो आहे.
अध्यक्षीय मनोगतात श्रीराम
पवार म्हणाले, भारताने सर्वसमावेशकवाद, तर पाकिस्तानने पृथकवाद स्वीकारला. इस्लाम
आणि धर्ममार्तंडांचा अनुनय करून त्यांना आपल्या पाठीशी उभे करायचे आणि त्यानंतर
त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचे, ही खेळी पाकिस्तानने अंगिकारली खरी, मात्र, ही
निती कधीही यशस्वी होत नाही. धर्माशी सांगड घालून चालणारे राजकारण हे अंतिमतः
आत्मघाताकडे, विनाशाकडेच घेऊन जाते. धर्मांधतेचा विळखा मात्र सोडविता येत नाही. पराकोटीची
धर्मांधता आणि टोकाच्या भेदाभेदातून पाकिस्तानात केवळ दहशतवादी संघटना फोफावल्या.
लष्कराने केवळ अंतर्गत राजकारणावर अंकुश राखण्यासाठीच आटापिटा केला. यातून त्यांची
वाटचाल दिशाहीन झाली. तरीही, बदलत्या भू-राजकीय आणि भू-अर्थशास्त्रीय
परिप्रेक्ष्यातून भारत-पाकिस्तान संबंधांचे आकलन करवून घेणे आवश्यक आहे. जागतिक
शक्तींच्या तालावर नाचावयाचे की हातात हात घालून स्वतःचा मार्ग चोखाळावयाचा, याचा
निर्णय दोन्ही देशांनी सूज्ञपणे घेण्याची गरज आहे.
डॉ. थोरात यांच्या या
दोन्ही व्याख्यानांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी उपस्थिती
दर्शविली. त्याचप्रमाणे डॉ. उषा थोरात, डॉ. रविंद्र भणगे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ.
जयश्री कांबळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नेहा वाडेकर
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment