सहा महिन्यांत २५ पेटंट प्राप्त करणाऱ्या संशोधकांचा विद्यापीठात गुणगौरव
शिवाजी विद्यापीठातील पेटंटप्राप्त संशोधकांच्या गुणगौैरव प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे |
कोल्हापूर, दि. ४ मार्च: विद्यार्थीदशेतच पेटंट
प्राप्त करण्याची कामगिरी करणाऱ्या गायत्री गोखले या विद्यार्थिनीस विद्यापीठाची
पेटंट अँम्बॅसॅडर म्हणून नियुक्त करावे आणि तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतही
संशोधन आणि पेटंटप्राप्ती या विषयी जागृती करावी, असे प्रतिपादन शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन,
इनक्युबेशन आणि लिंकेजेसच्या वतीने आज विद्यापीठातील पेटंटप्राप्त शिक्षक, संशोधक
आणि विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत
करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यापीठातील संशोधकांना एकूण २५
पेटंट प्राप्त झाले आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, बौद्धिक संपदा हक्क कक्षाचे प्रमुख डॉ. एस.बी. सादळे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. विद्यापीठाची संशोधकीय कामगिरी उंचावत
असल्याचे हे लक्षण आहे. शिक्षक आणि संशोधकांनी पेटंट मिळविणारी कामगिरी करणे
अपेक्षितच आहे. मात्र, विद्यापीठात बी.टेक.च्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या गायत्री
गोखले हिला स्थानिक स्रोतांपासून तेथील समस्या सोडविण्याचे संशोधन करावेसे वाटणे
आणि त्यामध्ये तिने पेटंट मिळविण्याची कामगिरी करणे आदर्शवत आहे. तिला विद्यापीठाची
पेटंटदूत केल्यास विद्यार्थ्यांमध्ये क्रमिक अभ्यासाच्या पलिकडे जाऊन मूलभूत संशोधन
करण्याची ऊर्मी जागृत होईल. त्यांच्यात विद्यार्थीदशेपासून आत्मविश्वास निर्माण होईल.
पेटंटप्राप्त शिक्षकांनीही आपल्यातील एकेका शिक्षकाला संशोधनाला पेटंट प्राप्त
करण्याच्या तांत्रिकतेविषयी अवगत करावे. महाविद्यालयीन शिक्षकांमध्येही या
अनुषंगाने जागृती करणे आवश्यक आहे.
यावेळी पेटंटप्राप्त शिक्षकांच्या वतीने डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. माधुरी वाळवेकर, हर्षवर्धन पंडित, डॉ. जे.बी. यादव आणि गायत्री गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यापीठाचे सहकार्य व मार्गदर्शन यांना दिले. पेटंटप्राप्तीची कामगिरी करणाऱ्यांमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह डॉ. एस.एन. सपली, डॉ. एस.पी. हांगिरगेकर, डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. ए.के. साहू, डॉ. एस.बी. चव्हाण, सी.जे. आवटी, हर्षवर्धन पंडित, श्रेया पंडित, डॉ. जे.बी. यादव, डॉ. टी.डी. डोंगळे, डॉ. के.डी. पवार, डॉ. एन.एल. तरवाळ, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. सचिन पन्हाळकर, कु. आर.जे. धाबर्डे, एच.ए. तिरमारे, श्रीपाल गायकवाड आणि गायत्री गोखले यांचा समावेश आहे.
कार्यक्रमात इनोव्हेशन,
इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. पेटंटप्राप्त संशोधकांना कुलगुरूंच्या हस्ते ग्रंथभेट देऊन
गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment