दर्जेदार ई-कन्टेन्टही तयार करावा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची अपेक्षा
कोल्हापूर, दि. २४ जून: शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास
मंडळाने ज्या गतीने क्रमिक पुस्तकांची निर्मिती केली, त्याच पद्धतीने आता दर्जेदार
ई-कन्टेन्ट निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने बी.ए.- भाग २ साठी तयार करण्यात आलेल्या सहा क्रमिक
पुस्तके आणि तीन स्वयंअध्ययन साहित्य पुस्तकांचे आज दुपारी व्यवस्थापन परिषद
सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रवदन नाईक यांनी केलेल्या आवाहनाला
इतिहासाच्या शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच
क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे या
लेखन प्रक्रियेमध्ये १५ ते २० शिक्षकांचा सहभाग असणे ही सुद्धा महत्त्वाची बाब
आहे. विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील स्वयंअध्ययन
साहित्याचे क्रमिक पुस्तकांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय कळीचा ठरला. त्यामुळे
विद्यापीठाची अधिकृत पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येऊ शकत आहेत. इतर
अभ्यास मंडळांनीही आपापली क्रमिक पुस्तकांची कामे सत्वर मार्गी लावावीत.
त्याचप्रमाणे इतिहासाच्या शिक्षकांनी आता व्यापक ज्ञाननिर्मितीसाठी दर्जेदार
ई-कन्टेन्ट निर्माण करण्याच्या दिशेनेही पावले टाकावीत.
या प्रकाशन समारंभाला कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इतिहास अभ्यास
मंडलाचे अध्यक्ष डॉ. चंद्रवदन नाईक, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, दूरशिक्षण
व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, अभ्यास मंडळे विभागाच्या
प्रभारी उपकुलसचिव विभा अंत्रेडी, डॉ. कविता गगराणी, दीपक काशीद, विनय शिंदे, उमेश
भोसले, दिलीप मोहाडीकर, डॉ. नितीन रणदिवे, डॉ. मुफीद मुजावर, डॉ. चांगदंव बंडगर,
योगेश पवार यांच्यासह पुस्तकांचे लेखक व संपादक उपस्थित होते.
आज प्रकाशित करण्यात
आलेल्या पुस्तकांमध्ये बी.ए. भाग-२ च्या सत्र ३ व ४ साठीच्या पुढील पुस्तकांचा
समावेश आहे. कंसात लेखकांची नावे दिली आहेत.
१. अतुल्य भारत (डॉ. धीरज
शिंदे, डॉ. स्वाती सरोदे) २. मराठा लोककला (डॉ. सुरेश शिखरे) ३. आधुनिक
महाराष्ट्राची निर्मिती (डॉ. तानाजी हवलदार, डॉ. रणजीत माने, डॉ. स्वाती सरोदे) ४.
पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा (डॉ. मधुकर विठोबा जाधव, डॉ. रामचंद्र घुले) ५. आधुनिक
भारताचा इतिहास (डॉ. आरती नाडगौडा, डॉ. अजितकुमार जाधव, डॉ. संदीप जाधव, डॉ. सुरेश
शिखरे) ६. वस्तुसंग्रहालयाची ओळख (डॉ. सुरेश शिखरे). या पुस्तकांचे संपादनाचे
कार्य डॉ. चंद्रवदन नाईक यांनी पाहिले आहे.
दूरशिक्षण आणि ऑनलाईन
शिक्षक केंद्राच्याही मराठा लोककला, आधुनिक भारताचा इतिहास तसेच आधुनिक
महाराष्ट्राची निर्मिती आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या तीन स्वयंअध्ययन
साहित्य पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या साहित्याचे डॉ. चंद्रवदन नाईक
यांच्यासह डॉ. सुरेश शिखरे, डॉ. सुरेश चव्हाण आणि डॉ. तानाजी हवलदार यांनी संपादन
केले आहे.

Very nice 👌
ReplyDelete