शिवाजी विद्यापीठात छत्रपती शाहू जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
![]() |
| शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंतीनिमित्त 'वदले शाहू छत्रपती' या विषयावर बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत. |
कोल्हापूर, दि. २५ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्यामुळेच या देशातील दलित, बहुजनांच्या
अस्तित्वाला अर्थ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला
हवे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक, संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आज येथे
केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१
जयंतीच्या पूर्वदिनास शिवाजी विद्यापीठ आणि शाहू सेना यांच्या संयुक्त
विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात समता परिषदेअंतर्गत श्री. सावंत
यांचे ‘वदले शाहू छत्रपती’ या विषयावर
व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती
प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. मंचावर
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
श्री. सावंत यांनी शाहू महाराज यांची भाषणे
आणि पत्रव्यवहार यांमधून प्रतीत होणारी त्यांची नीती, सामाजिक कार्य यांवर सविस्तर
प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे
सच्चे वारसदार होते. या दोघांच्या जीवनकार्यात, उद्दिष्टांत बहुतांश साम्य आहे.
आपल्या सैन्यामुळे शेतकरी रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये,
त्याचप्रमाणे मोबदला आदा करूनच लागेल तो शिधा, धान्य रयतेकडून घ्यावा, अशी
छत्रपतींची आज्ञापत्रे आहेत. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या पहिल्या
जाहीरनाम्यातच रयतेकडून सामग्रीचा पुरवठा होत असताना त्याचा मोबदला पुरवठादारास
जागेवरच आदा करण्याच्या अनुषंगाने विविध नियम घालून दिल्याचे दिसते. यामुळे
शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रांची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. विस्मरणात गेलेल्या
शिवराज्याभिषेक शकाचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले. महाराजांना
शेतकरी, मजूर अशा कष्टकरी जनतेविषयी ममत्वभाव होता. आपल्या हाडीमासी शिपाईगडी आणि
शेतकऱ्याचे रक्त भिनले असल्याचे ते म्हणत. आपल्या माणुसकीच्या हक्कांसाठी
आरंभलेल्या सामाजिक लढाईची तुलना त्यांनी त्या काळी झालेल्या पहिल्या महायुद्धाशी केली
आहे. जातिद्वेष हा या समाजाला ग्रासलेला जुनाट रोग असून जातीभेद नष्ट करून
धार्मिक, सामाजिक समता प्रस्थापनेसाठी ते आग्रही होते. महाराष्ट्रात शिक्षणाचा
पाया महात्मा फुले यांनी घातला आणि तो महाराष्ट्रभर विस्तारण्याचे महत्कार्य शाहू
महाराजांनी केले. विविध समाजघटकांतील पात्र युवकांच्या सैन्यभरतीसाठी
सिमल्यापर्यंत याचिका दाखल करण्यासाठी महाराज गेले, यातून त्यांच्या हृदयातील
ओलावाच दिसून येतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात महाराजांनी समाजासाठी
चांगले काम करणारी माणसे तयार केली, हे त्यांचे मोठे योगदान आहे.
शिवाजी विद्यापीठाने शाहू महाराजांविषयी
दस्तावेजीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगताना श्री. सावंत म्हणाले,
शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी शाहू महाराजांशी
संबंधित दस्तावेजांचे मोठ्या प्रमाणात संकलन केले. त्यांच्या नंतर डॉ. विलास संगवे
यांनीही त्यामध्ये कळीची भूमिका बजावली आणि महाराजांशी निगडित कागदपत्रांचे दहा
खंड निर्माण केले. डॉ. आण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहीलेले शाहू महाराजांच्या पहिल्या
चरित्राचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादन केले, तेही शिवाजी विद्यापीठाने
प्रकाशित केले. शिवाजी विद्यापीठामुळे शाहू महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थाने
लोकांसमोर आला, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
म्हणाले, शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेले कार्य खूप मोठे आहे. पी.सी.
पाटील यांच्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत महाराष्ट्र घडविणारी
आणि सर्वदूर प्रभाव टाकणारी मंडळी त्यांनी तयार केली. दुःखाच्या मुळापर्यंत
जाण्याची महाराजांची वृत्ती होती. समाजातील दुःख, दैन्य शोधून ते कमी करण्याबरोबरच
त्यावर जालीम औषध योजना करण्याचे कसबही त्यांच्याकडे होते. त्यामुळे ते लोकराजा
आणि माणूस म्हणूनही मोठे ठरले.
कार्यक्रमात सुरवातीला खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment