कोल्हापूर, दि. २० जून: डॉ. अभय बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी
फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड
रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेसमवेत झालेला सामंजस्य करार हा शिवाजी
विद्यापीठाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी भावना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
यांनी व्यक्त केली.
‘सर्च’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अभय बंग यांच्या प्रमुख
उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ आणि सर्च यांच्यादरम्यान काल (दि. १९) सामाजिक
संशोधनविषयक सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी कुलगुरू बोलत होते. यावेळी
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ.
शिर्के म्हणाले, डॉ. बंग हे महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या
अनौपचारिक आणि व्यावहारिक अशा नई तालीम शिक्षणाचे लाभार्थी वाहक आहेत. त्याच
कृतीशील कार्याचा वारसा पुढे नेत असताना त्यांनी ‘सर्च’ची स्थापना केली आहे. तेथे अनेक सामाजिक, आरोग्यविषयक
प्रश्नांवर व्यापक आणि सूक्ष्म अध्ययन व संशोधन केले जाते. शिवाजी विद्यापीठातील
शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सर्वप्रथम ‘सर्च’ची कार्यप्रणाली समजावून घेण्यास प्राधान्य द्यावे.
त्यानंतर त्यांच्यासमवेत आपल्याला कोणत्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त संशोधन करता
येईल, याविषयी मंथन करावे. सामाजिक दायित्वाच्या भावनेने प्रेरित विद्यार्थ्यांना
या संशोधनामध्ये सामावून घ्यावे, जेणे करून हे सहकार्यसंबंध दूरगामी ठरू शकतील.
डॉ. बंग यांच्यासमवेत शिक्षक व संशोधकांनी ठराविक कालावधीनंतर आढावा बैठक घेऊन
झालेले काम आणि पुढील कामाची दिशा या संदर्भातील नियोजन करावे, असे आवाहनही
त्यांनी केले.
डॉ. बंग म्हणाले,
कोल्हापूर ही शाहूनगरी आहे. या नगरीमधील शिवाजी विद्यापीठ आणि गडचिरोली येथील सर्च
यांचे एकत्र येणे आनंददायी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आता शैक्षणिक संस्थांना
विविध सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची दिशा व दृष्टी दिली आहे. त्यामुळे
नागरिकांना प्रत्यक्ष जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करणे शक्य होणार आहे.
शिवाजी विद्यापीठाने आता सर्चसमवेत सहकार्याचे नवे पाऊल उचलल्याचा आनंद तर आहेच,
त्याबरोबरच याद्वारे काही भरीव सामाजिक संशोधनपर काम साकार होईल, असा विश्वासही
वाटतो. त्यासाठी आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन
लाभण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ.
बंग आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य
मंडळाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. नितीन माळी, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. शिवाजी जाधव
उपस्थित होते.

No comments:
Post a Comment