वाचनसंस्कृतीच्या जागराने शहर दुमदुमले; शालेय विद्यार्थ्यांचाही
सहभाग
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त ग्रंथदिंडीस कमला कॉलेज येथे पालखीपूजनाने प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे. |
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सहभागी मान्यवर. |
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम, झांज व ढोल पथकाने मोठी रंगत आणली. |
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सहभागी मान्यवर. |
कोल्हापूर, दि. २८ मार्च: वाचन संस्कृती वाढविण्याचा संदेश देत तरुणाईने आज
कोल्हापूरच्या रस्त्यांवर जागर घातला आणि दोन वर्षांच्या खंडानंतर शिवाजी
विद्यापीठाची ग्रंथदिंडी शहरात पुन्हा दुमदुमली. ग्रंथदिंडीने दोन दिवसीय ग्रंथमहोत्सवाला
प्रारंभ झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साथीने शालेय विद्यार्थ्यांचा
उत्साही सहभाग, हे यंदाच्या दिंडीचे वैशिष्ट्य ठरले.
विद्यापीठाचा ५९वा दीक्षान्त समारंभ उद्या (दि. २९) आयोजित करण्यात
आला आहे. दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने दरवर्षी ग्रंथदिंडी व ग्रंथमहोत्सव
आयोजित करण्याची परंपरा विद्यापीठाने जोपासली आहे. तथापि, कोविड-१९मुळे मागील दोन
वर्षे दीक्षान्त समारंभाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आल्यामुळे ग्रंथदिंडी वा ग्रंथ
महोत्सव होऊ शकला नव्हता. यंदा मात्र प्रदीर्घ काळानंतर दीक्षान्त समारंभ ऑफलाईन
स्वरुपात होत असल्याने सर्वच घटकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांचाही
त्याला अपवाद नाही. त्याची प्रचिती आजच्या ग्रंथदिंडीमध्ये आली.
आज सकाळी साडेसात वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, बॅ. बाळासाहेब
खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, कमला महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीस
कमला महाविद्यालयाच्या व्ही.टी. पाटील भवनापासून प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. शिर्के
यांनी पालखी व ग्रंथपूजन केले. पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा, श्री
ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, महात्मा फुले व
सावित्रीबाई यांचे चरित्र, तसेच राजर्षी शाहू महाराज यांचा स्मारक ग्रंथ ठेवण्यात
आले होते. दिंडी राजारामपुरी, आईचा पुतळा आणि सायबरमार्गे दिंडी शिवाजी
विद्यापीठात प्रविष्ट झाली. दिंडी मार्गावर वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या
घोषणांसह आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे महत्त्व सांगणाऱ्या
घोषणा देण्यात येत होत्या. टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष
करण्यात येत होता. भारताकडे आलेले जी-२० परिषदेचे नेतृत्व, आंतरराष्ट्रीय तृणधान्य
वर्ष आणि वाचन संस्कृती यांसह विविध प्रबोधनपर फलक घेऊन शहरातील विविध
महाविद्यालयांचे ७५०हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी दिंडीत मोठ्या उत्साहाने
सहभागी झाले. यंदाच्या ग्रंथदिंडीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयीन
विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या बरोबरीने शहरातील शालेय विद्यार्थीही मोठ्या
संख्येने दिंडीत सहभागी झाले. त्यांच्या लेझीम, झांज व ढोलवादनाने दिंडीमध्ये खूपच
चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन
करून दिंडी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात विसर्जित करण्यात आली.
त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब
सभागृहासमोरील जागेत आयोजित ग्रंथमहोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
त्यांच्यासह मान्यवरांनी बॅ.बाळासाहेब खर्डेकर व ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.
एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर
कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह व्यवस्थापन परिषदेच्या सन्माननीय सदस्यांनी फिरून
ग्रंथमहोत्सवाची पाहणी केली व आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
या ग्रंथमहोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठाचा प्रकाशन विभाग आणि राज्यभरातून
आलेल्या १० प्रकाशक यांनी एकूण १८ स्टॉलवर विविध विषयांचे हजारो दर्जेदार ग्रंथ विक्रीसाठी
उपलब्ध केले आहेत. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विद्यापीठाच्या तंत्रज्ञान
अधिविभागाने १० स्टॉल मांडले आहेत. तेथे विद्यार्थी तृणधान्यांचे महत्त्व आणि आवश्यकता
या दृष्टीने प्रबोधन करणार आहेत. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे
एमबीए युनिट आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
एमबीएच्या विद्यार्थ्यांचे स्टार्टअप ट्रेड-फेअर उपक्रमांतर्गत पाच स्टॉल थाटले
आहेत. डॉ. आण्णासाहेब गुरव आणि अन्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या स्टॉलचे सर्व
संचालन विद्यार्थीच करीत आहेत. यामध्ये हस्तकला, शोभेच्या वस्तू, सँडविच, कोकम
सरबत, मठ्ठा, लिंबू सरबत, फ्रूटप्लेट, पाणीपुरी, आईसक्रीम, खवा पेढे यांचा समावेश
आहे. स्कूल ऑफ नॅनो-सायन्स व तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा औषधी आयुर्वेदिक
उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीचा स्टॉल आहे. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी
संघाच्या वतीने यंदाही माजी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी विशेष स्टॉल लावला
आहे. तेथे विद्यार्थी ऑफलाईन स्वरुपात नावनोंदणी करू शकतात. डॉ. गजानन राशिनकर
त्याची व्यवस्था पाहात आहेत. भूगोल अधिविभाग व क्लायमेट चेंज केंद्राच्या वतीनेही
पर्यावरणविषयक प्रबोधनाचा स्टॉल लावला आहे. तेथे डॉ. सचिन पन्हाळकर यांच्या
मार्गदर्शनाखाली अभ्यागतांचे प्रबोधन करण्यात येत आहे. विद्यापीठाने यंदा विशेष
बाब म्हणून एक स्टॉल हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड या संस्थेला विनाशुल्क उपलब्ध करून
दिला असून तेथे संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध हस्तकलेच्या
वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चार खाद्यपदार्थांचे स्टॉलही उपस्थितांच्या
सोयीसाठी आहेत. महोत्सवस्थळी ऑनलाईन पेमेंटही स्वीकृत करण्याची सुविधा उपलब्ध
करण्यात आली आहे. सदर ग्रंथमहोत्सव उद्याचा एक दिवसच उपलब्ध असून या प्रदर्शनाचा
विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. धनंजय सुतार यांनी केले
आहे.
आजच्या कार्यक्रमांना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या
अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले,
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ.
रामचंद्र पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आदी उपस्थित
होते. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. सुतार, ग्रंथालयशास्त्र अधिविभागाचे प्रमुख
डॉ. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. शिवराज थोरात, डॉ.
राजेंद्र खामकर, डॉ. सुनील बिर्जे, डॉ. धनंजय गुरव चंद्रशेखर गुरव, ए.बी. मातेकर,
श्रीमती एस.एस. पाटील, एम.एन. शेख, यु.एम. शिंदे यांच्यासह सर्व ग्रंथालय मदतनीस,
कर्मचारी, शिपाई, संशोधक विद्यार्थी व ग्रंथालयशास्त्राचे विद्यार्थी-विद्यार्थिनी
ग्रंथमहोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment