Sunday 5 March 2023

शिवाजी विद्यापीठात संशोधनास उपयुक्त पर्यावरण: इंग्लंडच्या शिष्टमंडळाचे कौतुकोद्गार

इंग्लंडच्या एस्पी उद्योग समूहाच्या शिष्टमंडळासमवेत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व अन्य अधिकारी, शिक्षक तसेच सेराफ्लक्स कंपनीचे पदाधिकारी
शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स व तंत्रज्ञान येथील सेराफ्लक्स कंपनीच्या संशोधकीय उपकरणांची पाहणी करताना इंग्लंडच्या एस्पी समूहाचे शिष्टमंडळ. शिष्टमंडळास माहिती देताना डॉ. किरणकुमार शर्मा.



शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागातील शास्त्रीय उपकरणांची इंग्लंडच्या शिष्टमंडळास माहिती देताना अधिविभाग प्रमुख डॉ. केशव राजपुरे.


कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी विद्यापीठातील वैज्ञानिक उपकरणे व साधने ही अत्याधुनिक स्वरुपाची असून विद्यापीठात अद्ययावत संशोधनासाठी अतिशय उपयुक्त पर्यावरण आहे, असे कौतुकोद्गार इंग्लंड येथील एस्पी उद्योग समूहाच्या शिष्टमंडळाने काढले.

सदर शिष्टमंडळाने दि. २ मार्च रोजी विद्यापीठातील नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागामध्ये स्थापित केलेल्या सेराफ्लक्स या कंपनीच्या वैज्ञानिक उपकरणांच्या प्रात्यक्षिकाच्या पाहणीसह विद्यापीठाचा पदार्थविज्ञान अधिविभाग, सैफ-डीएसटी केंद्र येथीलही संशोधनपूरक उपकरणे व सुविधांची पाहणी केली आणि अतिशय समाधान व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि या आधिविभागाचे इंडस्ट्रियल पार्टनर सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूर यांच्यामध्ये उत्तम संशोधन-संबंध निर्माण केले गेले असून या कंपनीच्या महत्त्वाच्या औद्योगिक समस्येच्या निरसनासाठी प्रा. (डॉ.) किरणकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या चमूचे स्कुल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागात संशोधन सुरू आहे. त्यातूनच एका विशिष्ट अशा महत्त्वपूर्ण उत्पादनाचे संशोधन व निर्मिती होत असून त्या उत्पादनाच्या मुलघटकांची गुणधर्मतपासणीही शिवाजी विद्यापीठाचे डीएसटी-सैफ केंद्र व पदार्थविज्ञान अधिविभाग यांच्या सहाय्याने होत आहे. त्याच अनुषंगाने याच सेराफ्लक्स कंपनीचे इंग्लंड या देशातील पार्टनर होऊ इच्छिणाऱ्या एस्पी (ESSPEE Ltd.) कंपनीचे शिष्टमंडळ सदर उत्पादनाची निर्मितीप्रक्रिया तसेच संशोधनप्रणाली पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे आले. नॅनोसायन्स अधिविभागातील शास्त्रीय उपकरणे आणि संशोधन प्रक्रियेबाबत डॉ. के. के. शर्मा यांनी विस्तृत माहिती दिली. त्यानंतर पदार्थविज्ञान अधिविभाग येथे डॉ. के वाय. राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवाजी विद्यापीठाच्या डीएसटी-सैफ केंद्र येथे डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या नेतृत्वाखाली येथील शास्त्रीय तथा तांत्रिक सुविधा आणि अद्ययावत उपकरणांच्या प्रयोगशाळांचीही त्यांनी पाहणी केली. 

त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह विद्यापीठातील प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

प्र-कुलगुरूंशी संवाद साधताना सेराफ्लक्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजीव तुंगतकर यांनी सध्या त्यांच्या कंपनीसाठी विद्यापीठात संशोधित केलेल्या उत्पादनासोबतच स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील तसेच एकूणच शिवाजी विद्यापीठातील संशोधन-पद्धती बाबत समाधान व्यक्त केले. या संशोधनातून आतापर्यंत ३ विद्यार्थी प्रशिक्षित झालेले असून त्या तिघांनाही सेराफ्लक्समध्ये प्लेसमेंट दिल्याचे तुंगतकार यांनी सांगितले. 

इंग्लंडच्या एस्पी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड कॅरिंग्टन म्हणाले, शिवाजी विद्यापीठातल्या संशोधनप्रणाली तसेच अद्ययावत शास्त्रीय उपकरणांच्या उपलब्धता पाहून विशेष आनंद वाटला. स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीला, संशोधन-सहयोगी म्हणून निवडल्याबद्दलह सेराफ्लक्सचेही त्यांनी कौतुक केले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी शिष्टमंडळास विद्यापीठातील संशोधन व विकासाच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल अवगत केले. 

शिष्टमंडळात कॅरिंग्टन यांच्यासह जाइल्स हँकिन्सन (चेअरमन, एस्पी), मुस्तफा बी. ओझे (एस्पीचे भारतातील व्यवस्थापक), संजीव तुंगतकार (चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सेराफ्लक्स, कोल्हापूर), आर. डी. धुमाळ (संचालक, संशोधन व विकास अधिकारी, सेराफ्लक्स), संजय पाटील (उपाध्यक्ष, बिझनेस डेव्हलपमेंट, सेराफ्लक्स), अमर घारमोडे (सरव्यवस्थापक, सेराफ्लक्स), एकनाथ घाडगे (वरिष्ठ व्यवस्थापक, सेराफ्लक्स) यांचा समावेश होता.

यावेळी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत, आयपीआर कक्षाचे संचालक डॉ. एस. बी. सादळे, विद्यापीठ-उद्योग समन्वय कक्षाचे डॉ. एस. डी. डेळेकर, डॉ. एस. एन. तायडे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment