Friday 17 March 2023

यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन युवकांनी ग्रामविकासाचे स्वप्न पूर्ण करावे: इंद्रजीत देशमुख

 

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी (डावीकडून) डॉ. भारती पाटील, इंद्रजीत देशमुख, डॉ. नितीन माळी व डॉ. उमेश गडेकर.

कोल्हापूर, दि. १७ मार्च: ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन युवकांनी ग्रामीण विकासाचे स्वप्न पूर्ण करावे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासनामार्फत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित यशवंतराव चव्हाण व स्थानिक स्वराज्य संस्था या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

श्री. देशमुख म्हणाले, यशवंतराव चव्हाण काळाचे भान असणारे नेते आणि तळागाळातील प्रत्येकाला आपले वाटणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा उदय आणि त्याकरिता त्यांची धडपड यांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन निर्णयप्रक्रियेवर उमटल्याचे दिसते. आजच्या पिढीने यशवंतरावांची कामाची शैली, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि तळागाळातील माणसांप्रतीची तळमळ ही तत्त्वे आत्मसात करून वाटचाल करणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागात काम करत असताना यशवंतरावांच्या कार्यप्रणालीचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे.

शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामधील स्त्रियांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थामधून  स्त्रियांचे नेतृत्व तयार होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास भविष्यात ग्रामीण विकासाचा वेग वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणातूनच ग्रामीण विकास साध्य होईल असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात काम करत असताना अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ऊर्मिला दशवंत, डॉ. मुनकीर मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उमेश गडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. संतोष सुतार, डॉ, कविता वड्राळे, सुधीर देसाई, डॉ, वैशाली भोसले, गजानन साळुंखे, चेतन गळगे, डॉ. अमोल मिणचेकर, मृणालिनी जगताप, डॉ. दादा ननवरे, डॉ. तानाजी घागरे, डॉ. नीलम जाधव, परशुराम वडार, डॉ. तेजश्री मोहरेकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment