Wednesday, 1 March 2023

जपानी कला-संस्कृतीच्या दर्शनाने विद्यापीठाचा दिवस ‘जपान’मय

 

शिवाजी विद्यापीठात ग्रंथभेट देऊन जपानी शिष्टमंडळाचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. मेघा पानसरे आणि डॉ. एस.बी. सादळे.

पारंपरिक जपानी खेळाचे सादरीकरण करताना जपानी विद्यार्थी

पारंपरिक जपानी खेळाचे सादरीकरण करताना जपानी विद्यार्थी

पारंपरिक जपानी ओरिगामी कलेचे सादरीकरण करताना जपानचे व शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी

शिवाजी विद्यापीठात जपान व भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त कार्यक्रमामुळे असा स्नेहबंध दृढ झाला.

जपानी व रशियन गीते सादर करताना शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी.

जपानी शिष्टमंडळासमवेत शिवाजी विद्यापीठाचे शिक्षक व विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. १ मार्च: जपानी ओरिगामी कला, पारंपरिक खेळ, वस्त्रपरंपरा, चित्रकला, संगीत आदींच्या साथीने शिवाजी विद्यापीठातला आजचा दिवस जपानमय होऊन गेला. त्यामुळे सर्वच उपस्थित भारावून गेले.

जपानच्या क्योतो सेइका विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आज शिवाजी विद्यापीठास भेट दिली. विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या साथीने विशेष कला-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही आपल्या जपानी व रशियन भाषाकौशल्यासह त्या भाषांतील गीत-संगीताच्या ज्ञानाचेही सादरीकरण केले. त्याचप्मराणे जपानमी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांनी स्वत: निर्मिलेल चित्रे, संगीत, शिल्पकला, व्हिडीओ, जपानी पारंपरिक वस्त्र डिझाईन, मांगा कॉमिक्स आदी विविध कलाविष्कारांचा स्थानिक विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. ओरिगामी, जपानी पारंपरिक खेळ केन्दामा यांची प्रात्यक्षिके दाखविली आणि उपस्थितांकडूनही करून घेतली.

शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा अधिविभाग, इंटरनॅशनल अफेअर्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने जपानी शिक्षक, विद्यार्थी भेटीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. त्याअंतर्गत समन्वयक श्रीमती सायुरी मात्सुनो आणि क्योतो सेइका विद्यापीठातील प्रा. शिन मात्सुमुरा, कोता तोदा, युको यासुइ, तसेच विविध विद्याशाखांचे विद्यार्थी रिन्तारो फुजिता, तेम्मा मियोशी, कोता योशिओका, रियोता सकामोतो, केन योशिकावा, त्सुमुगी निशिमुरा, मोएको नाइतो, युकिका नारादाते, कुणाल मात्सुनो यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता.

आज सकाळी समन्वयक मात्सुनो, प्रा. मात्सुमुरा, यांनी डॉ. मेघा पानसरे इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. एस. बी. सादळे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची भेट घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता प्रा. श्रीकृष्ण महाजन उपस्थित होते. यावेळी शिवाजी विद्यापीठ आणि क्योतो सेइका विद्यापीठ यांच्यात कोणत्या विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य व ज्ञान-कौशल्यांची देवाणघेवाण होऊ शकते, याविषयी चर्चा झाली.

जपानी भाषेच्या विद्यार्थ्यांना जपानी संस्था व कंपन्यांत शिक्षण व नोकरीच्या अनेक संधी आहेत. तेव्हा भाषा, मानव्यशास्त्र, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, अॅनिमेशन व संगीत अशा विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये भवितव्य आहे, असे मत मात्सुनो व मात्सुमुरा यांनी व्यक्त केले.

क्योतो सेइका विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ या संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम, विद्यार्थी-शिक्षक भेट व ऑनलाईन व्याख्याने अशा उपक्रमांसाठी परस्पर सामंजस्य करार करता येऊ शकेल, असे कुलगुरू प्रा. शिर्के यांनी सांगितले.

त्यानंतर वि.स. खांडेकर भाषा भवन येथील सभागृहात कला-सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. डॉ. पानसरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व स्वरूप स्पष्ट केले. जपानमध्ये लोकसंख्या संख्या कमी झाल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे भारतासह विविध देशांतील तरुणांना सर्व प्रकारचे, विशेषत: माहिती-तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन इंजिनिअर, डिझाईनर नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद केले.

सायुरी मात्सुनो यांनी जपानमधील क्योतो शहर ११०० वर्षे जपानचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र राहिले असल्याचे सांगितले. जपानी भाषा शिकून तिथे विविध क्षेत्रात ज्ञान व कौशल्याच्या संधी प्राप्त करा, असे आवाहन केले. प्रा. मात्सुमुरा यांनी जपानमधील अॅनिमेशन, कार्टून निर्मिती हा एक जागतिक उद्योग असल्याचे सांगितले. क्योतो हे निन्तेन्दो, किओसेरा यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्मात्यांचे उगमस्थान आहे. क्योतो विद्यापीठात मांगा विभाग, कला विभाग, जपानी कॅलीग्राफी, टेक्स्टाईल संशोधन केंद्रे महत्त्वाचे योगदान देत आहेत, असे सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठातील विविध अधिविभागांचे विद्यार्थी तसेच क्रिएशन मल्टीमिडिया अॅनिमेशन संस्था, बोन्सोय क्लब, इकेबाना क्लब येथील विद्यार्थी-सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. एस. बी. सादळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment