शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ
शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात. |
शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात. |
कोल्हापूर, दि. ३१ मार्च: आपल्या संपादित
ज्ञानाच्या आधारे सरकारला व्यापक सामाजिक हिताच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणे
शिक्षकांची जबाबदारी आहे, ती त्यांनी निर्भयपणे निभावली पाहिजे, असे प्रतिपादन
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन प्रा. सुखदेव थोरात
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित करण्यात आलेला पहिला ‘प्रा.डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार-२०२३’ प्रा. थोरात यांना आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रा. थोरात यांनी आपल्या भाषणात डॉ. जे.एफ.
पाटील यांचेच उदाहरण देत शिक्षकांवरील जबाबदारीचे अधोरेखन केले. ते म्हणाले, डॉ.
पाटील यांच्या जीवनकार्यापासून एक धडा शिक्षकांनी अवश्य घ्यायला हवा, तो म्हणजे
ज्ञानसंपादनाचा आणि ते समाजाला वाटण्याचा. शिक्षक ज्ञानाच्या क्षेत्रात असल्यामुळे
त्याला इतरांपेक्षा लवकर ज्ञान मिळते. ते ज्ञान समाजाच्या हितासाठी देत राहण्याचा
धडा डॉ. पाटील यांनी दिला आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्यावर,
लेखनावर, अभिव्यक्तीवर मर्यादा येत असतात; परंतु अशा काळातही
शिक्षकांनी आपली समाजशिक्षकाची भूमिका सोडता कामा नये. विविध सामाजिक-आर्थिक
विषयांच्या अनुषंगाने सरकारला मार्गदर्शन करीत राहिले पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण,
शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आदी शैक्षणिक बाबींच्या संदर्भातही अशा मार्गदर्शनाची
जबाबदारी त्यांनी निभावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. जे.एफ. पाटील यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग
अत्यंत गांभीर्यपूर्वक व प्रामाणिकपणे समाजहितासाठी वापरले. त्यांनी
अर्थसंकल्पापलिकडेही विविध सामाजिक-आर्थिक विषयांवर चिंतनपर समतोल मांडणी केली,
प्रबोधन केले. काही व्यक्ती आयुष्यभर लोकांच्या जीवनात सतपरिवर्तन आणण्यासाठी मोठा
झगडा मांडतात, त्या जनमानसात चिरंतन राहतात. त्यांच्यामाघारी त्यांचा हा वारसा
समाजाला प्रेरित करीत राहतो. डॉ. पाटील यांचा वारसा हा असा चिरंतन राहील, असे
गौरवोद्गार प्रा. थोरात यांनी यावेळी काढले.
कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,
शिवाजी विद्यापीठामध्ये सेवा बजावलेल्या शिक्षकाच्या नावे देण्यात येणारा हा
पहिलाच पुरस्कार आहे. डॉ. जे.एफ. पाटील यांनी समाजाशी निगडित विविध प्रश्नांवर
धाडसी आणि चिंतनपूर्ण मांडणी केली. त्यामुळे समाजाशी जोडला गेलेला एक अर्थतज्ज्ञ
असे त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यांनी केवळ अर्थशास्त्रीय विषयांच्या बाबतीतच
मांडणी केली नाही, तर समाजावर प्रभाव टाकणाऱ्या त्यापलिकडीलही अनेक विषयांवर
चिकित्सक प्रकाश टाकला.
यावेळी अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. विद्या कट्टी
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रा. थोरात यांचा परिचय
करून दिला. अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे यांनी पुरस्कारामागील
भूमिका स्पष्ट केली व मानपत्राचे वाचन केले. शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले, तर
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. जे.एफ. पाटील यांच्या पत्नी कमल पाटील
त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होत्या. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह
अर्थशास्त्राचे आजी-माजी शिक्षक, परिषदेचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख,
शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment