Friday, 17 March 2023

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा (दिवस पाचवा):

मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड संघांचे मोठे विजय

कोल्हापूर, दि. १७ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज पाचव्या दिवशी मुंबई, नागपूर, पुणे आणि नांदेड या सर्वच विद्यापीठांच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठे विजय मिळविले.

आजचा पहिला सामना मुंबई विद्यापीठ विरुद्ध कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात झाला. हा सामना मुंबईने ७ गडी राखून जिंकला.

जळगावने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. 18.3 षटकात सर्व बाद 116 धावा ते करू शकले. जितेंद्र पाटील यांनी 30 तर अभिमन्यू पवार व श्याम कुमावत यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. मुंबई विद्यापीठाच्या संजय पवार यांनी 4 तर श्रीकांत मोंडे यांनी 2 बळी घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने 9.4 षटकात 3 गडी गमावून 120 धावा केल्या. त्यात अनिल धडशी यांच्या 68 तर संजय पवार व सुशांत घाडी (नाबाद) यांच्या प्रत्येकी 21 धावांचा समावेश आहे. मुंबईचे संजय पवार सामनावीर ठरले.

सकाळचा दुसरा सामना महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना नागपूरने सहा गडी राखून जिंकला.

सोलापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात ९ बाद 143धावा केल्या. पंकेश व्हनमाने यांनी नाबाद 29, मुख्तार शेख यांनी 27 प्रशांत पुजारी यांनी 20 धावा केल्या. नागपूरच्या संदिप रिघे आणि विठ्ठल धाईगुडे यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल नागपूरने 19 षटकात 4 बाद 146 धावा केल्या. त्यात सतीश यादव यांच्या नाबाद 33 अतुल ढोक यांच्या नाबाद 31 धावांचा समावेश राहिला. संदीप रिंघे सामनावीर ठरले.

दुपारच्या सत्रातील पहिला सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरुद्ध शिवाजी विद्यापीठ-ब  यांच्यात झाला. हा सामना पुण्याने ८८ धावांनी जिंकला.

पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. त्यात मनीष गायकवाड यांनी 50 दिपक गजरमलने 35 धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या दिपक कांबळे यांनी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी विद्यापीठ '' संघ 15.3 षटकात 91 धावाच करू शकला. पुण्याच्या मनिष गायकवाड यांनी 3 बसवंत गजलवा, सुनिल माटे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मनिष गायकवाड सामनावीर ठरले.

दिवसातला अखेरचा सामना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात झाला. हा सामना नांदेडने ६५ धावांनी जिंकला.

परभणीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना नांदेडने 10 षटकात 5 बाद 187 धावा केल्या. त्यात नारशी कागडा यांच्या 58 धावा व पी.एम. मुपडे यांच्या 34 धावा होत्या. परभणी संघ प्रत्युत्तरादाखल खेळताना 20 षटकात 10 बाद 122 धावाच करू शकला. नांदेडच्या मुपडे व शैलेश यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. पी.एम. मुपडे सामनावीर ठरले.

No comments:

Post a Comment