Saturday, 26 November 2016

गरजांवर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती केल्यास

दूरशिक्षणाचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. बी.एम. हिर्डेकर




शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय दूरशिक्षणविषयक परिसंवाद उत्साहात


कोल्हापूर, दि. 26 नोव्हेंबर: गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करता विद्यार्थ्यांच्या, शिक्षणेच्छुक नागरिकांच्या गरजांवर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती केल्यास दूरशिक्षणाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र व शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (सुनोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने दूरशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय सुधारणा या विषयावरील एकदिवसीय परिसंवादाचे बीजभाषण करताना ते बोलत होते. दूरशिक्षण केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर होते.
डॉ. हिर्डेकर म्हणाले, माहिती व संवाद तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या क्रांतीकारक बदलांमुळे आता पारंपरिक शिक्षण व दूरशिक्षण यांमधील सीमारेषा पुसट होत चालली आहे. किंबहुना, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भौगोलिक मर्यादा आपण केव्हाच ओलांडल्या असल्याने दूरशिक्षण ही संज्ञा अधिकच सापेक्ष बनली आहे. या सापेक्षतेचा लाभ घेऊन आपले जागतिक शैक्षणिक संबंध व साहचर्य अधिक वृद्धिंगत करण्याची मानसिकता आपण विकसित करायला हवी. विकसित राष्ट्रांमधील शिक्षण संस्थांनी दूरशिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धन मिळविले. पण, आता हार्वर्ड, एमआयटी तसेच येलसारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचा दृष्टीकोन बदलला असून ऑनलाइन दूरशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे शेकडो अभ्यासक्रम त्यांनी जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहेत. तेथील पारंपरिक शिक्षणाचे ऑनलाइन शिक्षणक्रमात रुपांतर करण्यात त्यांनी मोठे यश मिळविले आहे. जगभरातील विद्यार्थी त्यांचा लाभ घेत आहेत.
मोबाईल अप्लीकेशन निर्माण करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची नितांत गरज असल्याचे सांगून डॉ. हिर्डेकर म्हणाले, आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे. त्याला त्याच्या आवडीचे विषय, स्टडी मटेरिअल अप्लीकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आणि ते वापरण्याची सवय विकसित केली की आपोआपच दूरशिक्षणाचे लाभार्थी वाढतील. दूरशिक्षण क्षेत्रातील सुधारणा या सद्यस्थितीत बहुतांशी तंत्रज्ञानाशी निगडित असून त्यासाठी आय.सी.टी.च्या सक्षम पायाभूत सुविधा, टेक्नो-सॅव्ही स्टाफ, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि ऑनलाइन इव्हॅल्युएशन, मासिव्ह ऑनलाइन ओपन अभ्यासक्रमांशी (मुक) दूरशिक्षणाची सांगड, खुल्या शिक्षण स्रोतांची उपलब्धता व वापर आदी बाबी आपल्याला कराव्याच लागणार आहेत. डाटा व्यवस्थापन आणि विश्लेषण यांवरच या सुधारणा अधिकतर अवलंबून आहेत. त्यामुळे डाटा व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे. पारंपरिक विद्यापीठांशी दूरशिक्षण केंद्रे संलग्न असली तरी त्यांना एडमिशन प्रक्रिया, अभ्यासक्रम निर्मिती अशा काही बाबतीत तरी स्वायत्तता देण्याची गरज असल्याचेही डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले.
भारताला शिक्षणाचा उज्ज्वल वारसा असून ज्यावेळी अन्य देश भाकरीसाठी झगडत होते, त्या काळी जगातील सर्वोत्तम विद्यापीठे भारतात होती, याची आठवणही डॉ. हिर्डेकर यांनी या प्रसंगी करून दिली.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर म्हणाले, ज्यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षण पोहोचलेले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे दूरशिक्षणाचे उद्दिष्ट आजही बदललेले नाही. वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षणासारखे प्रभावी साधन नाही. त्याला आता तंत्रज्ञानाची जोड देऊन दूरशिक्षण, पारंपरिक शिक्षण, वेब एज्युकेशन अशा शिक्षणाच्या सर्व उपलब्ध माध्यमांचा वापर करून ब्लेंडेड लर्निंगच्या सहाय्याने देशाच्या शिक्षण क्षेत्रातील सकल प्रवेश दर (जी.ई.आर.) वाढविण्यात निश्चितपणे यश प्राप्त करता येईल. त्यासाठी प्रशासकीय व तंत्रज्ञानात्मक सुधारणांबरोबरच दूरशिक्षण संस्था, केंद्रांनी आपल्या सक्षम बाजू (युनिक सेलिंग प्रपोझिशन्स) शोधून त्यांच्या प्रभावी सादरीकरणावर अधिक भर द्यायला हवा. यासंदर्भात जागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सुनोवाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. सोनजे यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. एम.ए. अनुसे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.
या परिसंवादास रिसोर्स पर्सन म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरमचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, दूरशिक्षण केंद्राच्या माजी संचालक डॉ. सीमा येवले, डॉ. अरुण भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील विविध अकृषी विद्यापीठांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment