कोल्हापूर, दि.16 नोव्हेंबर: नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनामुळे केमोथेरपी आणि औषधांविना उपचार करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व फ्रान्समधील ग्रीनोबेल विद्यापीठाच्या क्लिनटेक संस्थेचे संचालक प्रा.डॉ. फ्रॅन्कॉइस बर्जर यांनी आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागामार्फत ‘वैद्यकीय शास्त्रातील नॅनोटेक्नॉलॉजीचे महत्त्व’ या विषयावर राजर्षी शाहू सभागृहात आयोजित सार्वजनिक व्याख्यानामध्ये ते बोलत होते. परीक्षा नियंत्रक महेश काकडे अध्यक्षस्थानी होते. अत्यंत
प्रभावी सादरीकरणाद्वारे सुमारे दोन तास श्रोत्यांवर आपल्या ज्ञानाची मोहिनी घालून
खिळवून ठेवणाऱ्या डॉ.बर्जर यांनी वैद्यकशास्त्र व नॅनो तंत्रज्ञान यांचा सद्यस्थितीतील
परस्परसंबंध स्पष्ट केला. ते म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रासाठी नॅनो तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेली उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरली असून त्याद्वारे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याची पूर्वसूचना मिळविणे शक्य झाले आहे. त्यामुळे हृदयरुग्णावर वेळेत उपचार होण्यास मदत होणार आहे. नॅनो संशोधनातील क्रांतीमुळे मायक्रोस्कोपिक साधनांचा अत्यंत कमी वापर होत असून शरीरातील व्यंग दूर करणे शक्य झालेले आहे. नॅनो
तंत्रज्ञान हे वैद्यक शास्त्रासाठी मोठे वरदान ठरले असून भविष्यात या
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठमोठ्या शस्त्रक्रिया टाळून रुग्णांवर सुलभ पद्धतीने
शस्त्रक्रिया व उपचार करता येणे शक्य आहे.
परीक्षा नियंत्रक महेश काकडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, नॅनो टेक्नॉलॉजीतील संशोधन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरणारे असून या क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची प्रचंड संधी संशोधकांना उपलब्ध झालेली आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ.पी.एस.पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्व विषद केले. मेंदूशास्त्रज्ञ डॉ.शिवदत्ता प्रभू यांनी प्रा. बर्जर यांचा परिचय करुन दिला. के.डी.पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर अर्पिता तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment