Thursday, 3 November 2016

भारतातील बेस्ट ग्लोबल विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ २१वे





यु.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्टची ताजी क्रमवारी जाहीर

कोल्हापूर, दि. ३ नोव्हेंबर: अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशा यु.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट या प्रकाशन संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार येथील शिवाजी विद्यापीठाने भारतातील उत्कृष्ट ग्लोबल विद्यापीठांच्या यादीत २१ वे स्थान पटकावले आहे. यु.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्टच्या ताज्या अंकात ही माहिती देण्यात आली आहे.
शिक्षण, आरोग्य, पर्यटन या क्षेत्रांच्या संदर्भातील जगभरातील वृत्तांचा अधिकृत स्रोत मानले जाणारे यु.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट हे अमेरिकेतील ८० वर्षांहून अधिक काळ चाललेले मासिक आहे. जगभरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उपलब्ध संधींची माहिती देण्यासाठी या प्रकाशन संस्थेकडून विविध देशांतील महत्त्वाच्या व आघाडीच्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. संबंधित शिक्षण संस्थेचे संशोधनातील कार्य, आशियासह जगातील शैक्षणिक वर्तुळातील त्या संस्थेची प्रतिमा आदी निकषांवर ही निवड केली जाते. या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाने २१वे स्थान प्राप्त केले आहे. यादीतील आयआयटी, आयआयएस सारख्या संस्था वगळल्या तर अकृषी विद्यापीठांत दहावे स्थान मिळविले आहे.
या यादीत स्थान मिळविणारे शिवाजी विद्यापीठ हे पुणे विद्यापीठानंतर राज्यातील दुसरे विद्यापीठ ठरले आहे. पुणे विद्यापीठ या यादीत १७व्या स्थानी आहे. पंजाब विद्यापीठ या रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व आयआयटी, मुंबई अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

 गुणवत्तापूर्ण संशोधनावर शिक्कामोर्तब: कुलगुरू डॉ. शिंदे
भारतातील बेस्ट ग्लोबल विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळाल्याबदद्ल आनंद व समाधान व्यक्त करून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, यु.एस.न्यूज सारख्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेकडून शिवाजी विद्यापीठाची नोंद घेतली जाण्याला एक वेगळे महत्त्व आहे. यामुळे विद्यापीठात सुरू असलेल्या गुणवत्तापूर्ण संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेषतः मटेरियल सायन्सच्या संशोधनात गेल्या काही वर्षांत शिवाजी विद्यापीठाने जी आघाडी घेतली आहे, त्याचे हे फलित आहे. याबद्दल विद्यापीठातील सर्वच शिक्षक, संशोधक विद्यार्थी अभिनंदनास पात्र असून या पुढील काळात ते अधिकाधिक दर्जेदार संशोधन करण्यावर भर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment