शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित विशेष व्याख्यनात मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख. |
शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित विशेष व्याख्यनात मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख. |
शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व परीक्षा
मार्गदर्शन केंद्रात विशेष व्याख्यान
कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: स्वतःच्या
प्रेरणेचा स्रोत बाहेर नव्हे, तर तुमच्या आतमध्ये शोधा, तेव्हाच खऱ्या अर्थाने
जीवनात यशस्वी होण्याची गुरूकिल्ली तुमच्या हाती येईल, असे प्रतिपादन कोल्हापूर
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज येथे केले. शिवाजी
विद्यापीठाच्या सेवा-पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित सन
२०१९-२०च्या उद्घाटन समारंभात ‘स्पर्धा
परीक्षा आणि रोजगार संधी व आव्हाने’ या
विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. देशमुख म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना आपण बाहेरच्या
जगामध्ये प्रेरणेचे स्रोत शोधत असतो. ते स्वाभाविकही आहे. तथापि, अशा प्रेरणास्रोतांचा
प्रभाव कालांतराने ओसरतो. मात्र, तुमच्या स्वयंप्रेरणेचा स्रोत नेमका कोणता आहे,
हे जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात शोधले आणि तो तुम्हाला गवसला, की
त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्हाला यशाचा मार्ग सापडतो. त्यावेळी कोणत्याही
बाह्यप्रेरणेची अजिबातच गरज राहात नाही.
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात करीत असतानाच आपल्याला कोणत्या
स्तरापर्यंत जावयाचे आहे, याचा निर्णय घेऊन त्या दिशेने तयारी करावी, असे सांगून
डॉ. देशमुख म्हणाले, स्वतःचा कल तपासून अगदी शास्त्रीय पद्धतीने स्वयंमूल्यमापन केल्यानंतरच
परीक्षार्थीला कोणती परीक्षा द्यावयाची अगर कोणत्या क्षेत्राकडे जावयाचे, याचा
निर्णय घेणे सोयीचे असते. अन्यथा मनामध्ये केवळ संभ्रम निर्माण होत राहतो आणि
त्याची परिणती अपयशामध्ये होत असते. त्यामुळे हे क्षेत्र निर्धारणही फार
महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षेचा अभ्यास ही तर
अत्यंत मूलभूत पायरी आहे. या अभ्यासाचे स्टडी मटेरियलही बऱ्यापैकी ठरलेले असते.
त्यामुळे या परीक्षांमध्ये अन्य उमेदवारांच्या तुलनेत आपल्याला आघाडी मिळवायची
असेल तर आपण जी माहिती, घटना वाचतो, त्यांचे सखोल विश्लेषण करणे आणि वाचलेल्या
संकल्पनांचे उपयोजन सांगता येणे या बाबींना अतिशय महत्त्व आहे.
घटना-माहिती-ज्ञान-शहाणपण हे चार टप्पे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असतात. केवळ
एखादी घटना अगर प्रसंग माहिती झाल्यानंतर त्याची कारणमीमांसा करण्याच्या दृष्टीने आपण
विचार, चिंतन करणार नाही, तोपर्यंत आपल्या विवेचनामध्ये सखोलता येणार नाही.
त्यामुळे दैनंदिन जीवनातही आपण ही विश्लेषणक्षमता विकसित करण्याची सवय लावून
घ्यायला हवी. तरच अखेरीस ज्ञान आणि शहाणपण आपल्यामध्ये येईल.
स्पर्धा परीक्षांकडे केवळ ग्लॅमर आणि भरपूर पैसा मिळविण्याचे साधन
म्हणून जर कोणी पाहात असेल तर कृपया हा तुमचा मार्ग नाही, हे लक्षात घ्या. स्पर्धा
परीक्षेनंतरचे आयुष्य हे सन्माननीय मध्यमवर्गाचे आहे आणि इथे तुम्ही समाजाप्रती
बांधिलकी निभावण्यासाठी अथक आणि अखंड मेहनत करण्याच्या इराद्याने आणि तयारीनेच आले
पाहिजे, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी या प्रसंगी केले. यावेळी त्यांना आपल्या
एमबीबीएस डॉक्टर होण्यापासून ते युपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवासही अतिशय
ओघवत्या शब्दांत उलगडला.
यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. पी.एस. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले. अमित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन कदम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment