आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण
कोल्हापूर, दि. १३ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘शिव सहाय्यता केंद्रां’तर्गत ‘आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण’ केंद्राचा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह असल्याचे गौरवोद्गार राज्याचे
महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
चंद्रकांतदादा पाटील यांनी काल येथे काढले.
शिवाजी विद्यापीठात काल (दि. १२ सप्टेंबर) शिव सहाय्यता केंद्राचे
उद्घाटन ना. श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने शिव सहाय्यता
केंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षणाच्या संदर्भात प्रशिक्षित
मनुष्यबळ निर्मितीचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. महापुरासारख्या आपत्तीच्या
क्षणी अशा प्रशिक्षित मनुष्यबळाचा शासन व प्रशासनाला निश्चितपणे सकारात्मक उपयोग
होत असतो. त्या दृष्टीने या केंद्राला मोठे महत्त्व आहे.
मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते यावेळी केंद्राच्या कोनशिलेचे
अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.
या केंद्राची माहिती देताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले,
कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात यंदा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या
अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता भविष्यात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जागृती व आपत्ती
व्यवस्थापन नियोजनाच्या मार्गदर्शनासाठी विद्यापीठाने शिव सहाय्यता केंद्रांतर्गत
आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचे ठरविले. या केंद्राला,
त्याच्या प्रारुप आराखड्याला आणि अनुषंगिक पदनिर्मितीसाठी विद्यापीठाच्या
व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून केंद्राच्या कार्यवाहीसाठी २५ लाख
रुपयांच्या निधीची तरतूद करण्यासही मान्यता दिली आहे.
या उद्घाटन समारंभास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी
व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय
सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी.
गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, श्री. राहुल चिकोडे, व्यवस्थापन
परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्य अमित कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापन परिषद,
विद्या परिषद तसेच अधिसभा यांचे सन्माननीय सदस्य यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय
अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment