रसायनशास्त्र विभाग, संशोधक वसतिगृह आणि ‘कमवा व शिका’ विद्यार्थिनी
वसतिगृहाचा समावेश
कोल्हापूर, दि. १३ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात
नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन राज्याचे महसूल व सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या
हस्ते काल अत्यंत उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
प्रमुख उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र
अधिविभागासाठी नूतन विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत
मुलींच्या वसतिगृहाची इमारत आणि संशोधक विद्यार्थी वसतिगृहासाठी इमारत अशा एकूण
तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत.
रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतीचे
पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत तळमजल्याचे ८१६.२९ चौरस
मीटर क्षेत्रफळाइतके बांधकाम पूर्ण झाले आहे. संशोधक विद्यार्थी वसतिगृहाच्या
इमारतीचे तळघर अधिक तळमजला असे बांधकाम विद्यापीठाच्या स्वनिधीमधून करण्यात आले
आहे. एकूण १२९१.०२ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण १००
संशोधक विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था होणार आहे. त्याचप्रमाणे ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत
तीनमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून तळमजला विद्यापीठाच्या
स्वनिधीतून तर वरील दोन मजले ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’च्या (रुसा)
अनुदानातून बांधण्यात आले आहेत. १३७१ चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. येथे सुमारे
१५० विद्यार्थिनींची निवास व्यवस्था आहे. सर्व इमारतींचे बांधकाम सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
उपरोक्त सर्व इमारतींचे उद्घाटन काल (दि. १२
सप्टेंबर रोजी) सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते
करण्यात आले. कोनशिला अनावरण आणि इमारतींमध्ये फीत कापून प्रवेश करून हे उद्घाटन
करण्यात आले. या वेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.
पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना
समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, अधिष्ठाता
डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, श्री. राहुल चिकोडे, व्यवस्थापन परिषदेवरील
राज्यपाल नियुक्त सदस्य अमित कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद
तसेच अधिसभा यांचे सन्माननीय सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय
अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment