Thursday, 5 September 2019

सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांनी कारकीर्द घडवावी: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त पदार्थविज्ञान विभागातील अजिंक्य भोसले आणि दामिनी माळी या विद्यार्थ्यांना 'निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्ती'चे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रसूल कोरबू, डॉ. संभाजी शिंदे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, जी.एस. राठोड आदी उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठात निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्तीचे वितरण

कोल्हापूर, दि. ५ सप्टेंबर: शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या शिक्षकांचा आदर्श घेऊन आयुष्यात सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन कारकीर्द घडवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१८-१९साठीच्या निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्तीचे आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून वितरण करण्यात आले. त्या निमित्ताने व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागातील एम.एस्सी. भाग-२ मधील विद्यार्थी अजिंक्य राम भोसले आणि दामिनी प्रकाश माळी या दोघांना या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. पदार्थविज्ञान विभागातील निवृत्त शिक्षक व संशोधक डॉ. बी.व्ही. खासबारदार यांनी एप्रिल १९९९मध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून रु. ५५ हजार रुपयांचा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. त्याच्या व्याजातून सदर शिष्यवृत्ती दरवर्षी डॉ. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमध्ये राहून पदार्थविज्ञान विभागात प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार दिली जाते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. खासबारदार हे स्वतः स्पेक्ट्रोस्कोपी विषयाचे गाढे अभ्यासक व उत्कृष्ट संशोधक व मार्गदर्शक होते. पदार्थविज्ञान विभागात मार्च १९६५पासून ते कार्यरत होते. ३५ वर्षांत त्यांनी अत्यंत मोलाची अध्यापकीय व संशोधकीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे न्यावा, यासाठी प्रेरणा म्हणून त्यांनी ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. शिष्यवृत्तीला त्यांनी आपले नाव न देता केवळ निवृत्त शिक्षकाची शिष्यवृत्ती असे संबोधले. हा त्यांचा निरलसपणा अनुकरणीय आहे. त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानलालसा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रसूल कोरबू, डॉ. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनचे रेक्टर डॉ. संभाजी शिंदे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, जी.एस. राठोड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment