Friday, 20 September 2019

अतिक्लिष्ट भू-पर्यावरणीय समस्येच्या विश्लेषणाची भूगोलात क्षमता: डॉ. रविंद्र जायभाय



शिवाजी विद्यापीठाच्या भूगाल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. रविंद्र जायभाय. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. अरुण पाटील, डॉ. सचिन पन्हाळकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. संभाजी शिंदे.

कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: अत्यंत क्लिष्ट भू-पर्यावरणीय समस्येचे विश्लेषण करण्याची क्षमता ही भूगोल विषयाच्या तज्ज्ञ व संशोधकांची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. रविंद्र जायभाय यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठ भूगोल शिक्षक संघाच्या सहकार्याने आयोजित भू-पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकास या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस आजपासून प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटक या नात्याने डॉ. जायभाय बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
Dr. Ravindra Jaibhai
डॉ. जायभाय म्हणाले, भूगोल विषयाकडे केवळ सामान्यज्ञानाचा विषय म्हणून पाहण्याची आपल्याला सवय आहे. प्रत्यक्षात पूर, दुष्काळ आदींसारख्या अनेक भू-पर्यावरणीय समस्यांचे नेमके विश्लेषण करण्याची क्षमता त्यात आहे. कला आणि शास्त्र यांचा संगम या विषयात आहे. मानव व पर्यावरण यांच्यातील नातेसंबंधाचे, त्यांतील समस्यांचे विवेचन व निराकरण भूगोलाद्वारेच शक्य आहे. या विषयाच्या अभ्यासकांमध्ये दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह सैद्धांतिक बाबींवर काम करतो, तर दुसरा प्रादेशिक प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देतो. सैद्धांतिक पद्धतीने ज्या प्रश्नांची सोडवणूक करता येऊ शकत नाही, त्यांना प्रादेशिक पद्धतीनेच भिडावे लागते. क्लिष्ट समस्यांच्या निराकरणासाठी या दोन्हींची सांगड घालून संशोधकाला विश्लेषण करावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, स्थानिक भू-पर्यावरणीय समस्यांच्या निराकरणाला प्राधान्य देऊन जागतिक स्तरावर त्यांना स्थान मिळवून देण्याचे काम भूगोलतज्ज्ञांनी करण्याची गरज आहे. भूगोलाचे काम केवळ माहिती, आकडेवारी गोळा करण्याचे नाही. तर त्या माहितीचे सर्वंकष विश्लेषण करून भू-पर्यावरणीय प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी काम करणे अभिप्रेत आहे. डॉ. सचिन पन्हाळकर व डॉ. जरग यांनी काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या भू-पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास व विश्लेषण करून आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रसिद्ध केला. या संशोधनाचे जागतिक स्तरावर कौतुक झालेच, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या या संशोधनाची दखल घेतली आहे. त्यामुळे संशोधन स्तरावरील दर्जावृद्धीसाठी काम करण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आंतरविद्याशाखीय सहकार्य वृद्धीची देखील मोठी गरज आहे.
Dr. D.T. Shirke
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. समन्वयक डॉ. संभाजी शिंदे यांनी स्वागत केले. अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. डॉ. डी.एच. पवार यांनी आभार मानले. यावेळी माजी भूगोल विभाग प्रमुख डॉ. के.सी. रमोत्रा, डॉ. अंबादास जाधव यांच्यासह भूगोल अधिविभागातील शिक्षक, हिमाचल प्रदेश गोवा, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील साधन व्यक्ती व संशोधक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment