Friday, 27 September 2019

शिवाजी विद्यापीठात वैद्यकीय माहिती व्यवस्थापन शास्त्राचा नूतन अभ्यासक्रम



जर्मन विद्यापीठाच्या सहकार्याने राबविला जाणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम

कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाने एम.एस्सी.साठी वैद्यकीय माहिती व्यवस्थापन शास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि कालसुसंगत शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नवे दालन खुले केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून चालविला जाणारा हा विद्यापीठातील पहिलाच अभ्यासक्रम आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत आहे.
वैद्यकीय माहिती व्यवस्थापन शास्त्र (मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट) ही जागतिक स्तरावरील हेल्थकेअर उद्योगाच्या दृष्टीने उदयास आलेली एक अतिशय महत्त्वाची विज्ञानशाखा आहे. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र अधिविभागाने जर्मनीस्थित हॉश्चुल हॅनोव्हर युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस अँड आर्ट्स या विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या विषयाचा एम.एस्सी.साठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत अखेरच्या चौथ्या सत्रामध्ये उपरोक्त दोन विद्यापीठांच्या दरम्यान स्टुडंट्स एक्स्चेंज उपक्रम राबविण्यात येणार असल्याने येथील विद्यार्थ्यांना जर्मनीतील विद्यापीठात जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील नवनवीन प्रवाहांचा वेध घेता येणे शक्य होणार आहे. या कालावधीतील सदर विद्यार्थ्यांची तेथील निवास व भोजन व्यवस्था संबंधित विद्यापीठ करणार आहे. त्यासाठी वेगळे शैक्षणिक शुल्क नसेल.
या अभ्यासक्रमाचे महत्त्व व वैशिष्ट्ये सांगताना जैवरसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.डी. सोनवणे म्हणाले, या अभ्यासक्रमामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अध्यापन व संशोधन पद्धतींची थेट ओळख होणार आहे. त्याचप्रमाणे क्लिनिकल रिसर्चसाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. हेल्थकेअर क्षेत्रात ड्रग सिन्थेसिसपासून एनिमल अगर ह्युमन टेस्टिंगपर्यंत आणि तेथून अंतिम मान्यतेपर्यंतचा एक मोठा टप्पा असतो. त्यातल्या विविध टप्प्यांवर या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी असते. पोस्ट क्लिनिकल अभ्यास व संशोधन करण्यासाठीही मोठे अवकाश त्यांना उपलब्ध असते. अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स उद्योगांसह क्लिनिकल रिसर्च करणाऱ्या संस्था, औषध कंपन्या, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, टेलिमेडिसीन आदी अनेकविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, क्लिनिकल डाटा असोसिएट्स, क्लिनिकल रिसर्चर, मेडिकल राईटिंग, कॅपिटल सीआरएफ डेव्हलपर तसेच संशोधक म्हणून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
झायडस, साव्हा, सिंजेन, एरिस लाइफ सायन्सेस, कॅक्टस, कॉग्निझंट, टाटा इएलएक्सआय, एस्ट्रा झेनिका, मर्क फार्मा, सिप्ला आदींसारख्या प्रख्यात हेल्थकेअर कंपन्यांसह वैद्यकीय हॉस्पिटल्समध्येही अनेक नवनवीन रोजगार संधी निर्माण होत असल्याचेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह डॉ. ज्योती जाधव, डॉ. अतुल कापडी, जर्मनी येथील डॉ. ज्ञानेश लिमये आणि हॉश्चुल हॅनोव्हर विद्यापीठातील अधिविभाग प्रमुख तसेच युनेस्कोच्या बायोएथिक्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गेरहार्ड फर्टविंगेल यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

एम.एस्सी.- एम.एम.आय. अभ्यासक्रम असा आहे-
या अभ्यासक्रमात पुढील अनेक आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन हेल्थ सायन्सेस, एपिडिमियॉलॉजी, मेडिकल इन्फॉर्मेटिक्स, जर्मन लँग्वेज ए-१, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल क्वालिटी मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च, ड्रग डिस्कव्हरी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, एथिक्स इन क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल, केस रिपोर्ट फॉर्मेट (सीआरएफ), ड्रग अप्रूव्हल प्रोसेस, नर्सिंग इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी इन्फॉर्मेशन सिस्टीम, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम), क्वालिटी एश्योरन्स, फार्मेको व्हिजिलन्स (पीव्ही), फार्मेको व्हिजिलन्स ग्लोबल परस्पेक्टीव्ह, ग्लोबल ऑडिट, ड्रग रेग्युलेटरी ऑथोरिटी, गाइडलाइन्स फॉर फार्मास्युटिकल्स- न्युट्रास्युटिकल्स अँड कॉस्मेटिक्स, गाइडलाइन्स फॉर हर्बल अँड अल्टरनेटिव्ह मेडिसीन, प्रोसेस ऑफ नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थकेअर प्रोफेशनल्स (एन.ए.बी.एच.), डेटा अॅक्विझिशन, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट (सीडीएम), कलेक्शन इंटिग्रेशन अॅन्ड अव्हेलॅबिलिटी ऑफ डेटा, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन अँड क्वालिटी कंट्रोल, हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचआयएस), पेशंट रिपोर्टेड सिस्टीम्स (पीआरएस), पब्लिक हेल्थ अँड एचआयएस, प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड एचआयएस इत्यादी अत्याधुनिक हेल्थकेअर विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.

हेल्थकेअर उद्योगाला अद्ययावत मनुष्यबळासाठी उपयुक्त अभ्यासक्रम: डॉ. अतुल कापडी
शिवाजी विद्यापीठाने जर्मनीच्या विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू केलेला वैद्यकीय माहिती व्यवस्थापन हा एम.एस्सी. अभ्यासक्रम हेल्थकेअर उद्योगाला अद्ययावत शिक्षण व प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा एक अत्यावश्यक अभ्यासक्रम आहे, असे विद्यापीठाच्या एम.एम.आय. अभ्यासक्रमासाठी नियुक्त अभ्यास मंडळ उपसमितीचे सदस्य डॉ. अतुल कापडी यांनी सांगितले.
डॉ. कापडी म्हणाले, हेल्थकेअर इंडस्ट्री आता इन्फॉर्मेटिक्स, आयटी आधारित काम करणारी आहे. या डाटा ड्रिव्हन उद्योगाला माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबरोबरच हेल्थकेअर विश्लेषणाचे ज्ञान असणारे मनुष्यबळही आवश्यक आहे. भारत सरकारने आयुष्मान भारत हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालविलेला आहे. तो संपूर्णतः इन्फोर्मेटिक्स आधारित आहे. त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय हॉस्पिटलना आवश्यक असणाऱ्या एन.ए.बी.एच. (नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थकेअर प्रोफेशनल्स) या अॅक्रिडिटेशनसाठी मोठ्या प्रमाणात डाटा द्यावा लागतो. त्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासते. तिथेही या विद्यार्थ्यांना मोठी संधी असेल, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
हेल्थकेअर उद्योगाशी निगडित असणारा मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा आजघडीचा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. त्याचा लाभ शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्हावा, या दृष्टीने जर्मनीतील हॉश्चुल हॅनोव्हर विद्यापीठाशी शिवाजी विद्यापीठाने सहकार्य करार करून स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम राबविण्याचे ठरविले. त्याचा या शाखेच्या विद्यार्थ्यांना भावी करिअरच्या दृष्टीने खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.

2 comments:

  1. There is Placement after the course or not plz informe me and going to Germany is confirme in semester four

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Sir, you may please contact the Biochemistry Department for the details. Thank you.

      Delete