Thursday, 26 September 2019

ट्युनिशियाच्या डॉ. राबिया होउयाला यांची

शिवाजी विद्यापीठात ‘ग्यान’अंतर्गत व्याख्याने



आजपासून प्रारंभ
कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात उद्या, शुक्रवार (दि. २७ सप्टेंबर) पासून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर एकॅडेमिक नेटवर्क (GIAN) या प्रकल्पांतर्गत ट्युनिशिया येथील सौजे विद्यापीठाच्या प्राध्यापक व ट्युनिशियन असोसिएशन फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती  डॉ. राबिया  होउयाला यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन उद्या सकाळी ११ वाजता नीलांबरी सभागृहात होईल. ही माहिती समन्वयक डॉ. कल्याणी पवार यांनी दिली.
ग्यान उपक्रमांतर्गत आयोजित या व्याख्यानमालेत डॉ. होउयाला या वनस्पतींच्या परस्परातील संबंधाचा शाश्वत शेतीमध्ये वापरया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. वर्षा जाधव,  प्रा. एस. एस. कांबळे, प्रा. डी.के. गायकवाड,  प्रा. एन.बी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.
सध्याच्या कृत्रिम रसायनांच्या अतिवापरामुळे वातावरणातील प्रदूषण, मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, पिकांचे घटते उत्पादन आदी परिस्थितीमध्ये ऍलिलोपॅथीचा (Allelopathy) उपयोग शेतीला उपयुक्त ठरेल. वनस्पतींची ही क्षमता केवळ पर्यावरण रक्षणाच्याच नव्हे; तर, पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असते. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांमध्ये या उपयुक्ततेची जागृती करणे तसेच याच्या वापराचे प्रशिक्षण देणे या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत ऍलिलोपॅथीची संकल्पना, त्याचा शाश्वत शेतीमध्ये होऊ शकणारा उपयोग, जागतिक स्तरावरील त्याच्याशी निगडित घडामोडी, तणनाशकांचे दुष्परिणाम, तण कीडींचे जैविक नियंत्रण आदी विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
दि. २७ सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान चालणाऱ्या या व्याख्यानमालेसाठी ४५ पदवीधर, पदव्युत्तर  तसेच संशोधक विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहितीही डॉ. पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment