Monday 16 September 2019

जागतिक ओझोन दिनानिमित्त

शिवाजी विद्यापीठात पथनाट्य

जागतिक ओझोन दिनानिमित्त विशेष पथनाट्याचे सादरीकरण करताना शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे विद्यार्थी.


जागतिक ओझोन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पथनाट्य सादरीकरण पाहताना कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. आर.के. कामत आदी.

पथनाट्य सादरीकरणानंतर सादरकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी.

कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे विशेष पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक तापमानवाढीच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात येतो. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाद्वारेही विविध उपक्रम, स्पर्धा आदींच्या माध्यमातून याविषयी जागृती करण्यात येते. आज ओझोन दिनाचे औचित्य साधून या अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर वन-वणवा हे पथनाट्य सादर केले. वृक्षतोड रोखून रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. सादरीकरणानंतर श्री. कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना अधिक प्रभावी सादरीकरणासाठी मौलिक टीप्स दिल्या.
या पथनाट्याचे लेखन डॉ. योजना पाटील यांनी केले, तर अस्मिता पाटील, अभिजीत मोरे यांनी गीतलेखन केले. या पथनाट्यात राहुल घट्टे, अनुजा जाधव, वैशाली देसाई, रुपाली उपळकर, मयुरी गोसावी, ज्योती कांबळे, महेश चव्हाण, अक्षय पाटील आणि प्रेरणा घेवारी यांनी पथनाट्यात काम केले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, पर्यावरण अधिविभाग प्रमुख डॉ. पी.डी. राऊत, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत, डॉ. आसावरी जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment