Monday 30 September 2019

सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांविरोधात राजा ढालेंचा अखेरपर्यंत संघर्ष: पँथर ज.वि. पवार

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार. शेजारी डॉ. हरिष भालेराव व डॉ. जगन कराडे.


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार. शेजारी डॉ. हरिष भालेराव व डॉ. जगन कराडे.

कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर: मंत्रीपद, खासदारकी अशा क्षणभंगूर आमिषाच्या मोहात न पडता सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांविरोधात अखेरपर्यंत संघर्षाचा निर्धार राजा ढाले यांचा होता आणि त्यांनी तो अखेरच्या श्वासापर्यंत निभावला, असे प्रतिपादन दलित पँथर चळवळीचे प्रवर्तक व ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने दलित चळवळ ते आंबेडकरी चळवळ: पँथर राजा ढाले यांचा परिप्रेक्ष्य या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव अध्यक्षस्थानी होते.
ज.वि. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राजा ढाले यांचे पँथर चळवळीसह आंबेडकरी चळवळ आणि त्यांचे साहित्यिक-सांस्कृतिक योगदान यांच्यावर प्रकाश टाकला. ५० वर्षांहूनही अधिक काळचे निकटचे स्नेही या नात्याने त्यांच्याविषयी बोलताना श्री. पवार यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, राजा ढाले यांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान हे त्यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेल्या योगदानाइतकेच महत्त्वाचे आहे. किंबहुना, या चळवळीला वैचारिक अधिष्ठान देण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केले. दलित साहित्याचा उगम झाला, त्यावेळी राजा ढाले यांनी पुढे होऊन त्या चळवळीला रक्षण पुरविले नसते, तर त्या चळवळीची तेव्हाच भ्रूणहत्या झाली असती, हे वास्तव आहे. त्यांचे हे योगदान कोणालाही नाकारता न येणारे आहे. दलित साहित्याच्या टीकाकारांना सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर देऊन त्यांनी त्यांची तोंडे बंद केली.
लघु अनियतकालिकांच्या चळवळीला खतपाणी घालून मोठे करण्याचे काम राजा ढाले यांनी केल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, लघु अनितकालिक चळवळीच्या विद्यापीठाचे राजा कुलगुरू होते. या लढ्याला महत्त्व प्राप्त करून देणारे विद्रोह हे अनियतकालिक त्यांनी सुरू केले आणि तेव्हापासून मराठी साहित्यात दलित साहित्याची लाट निर्माण झाली. या चळवळीला दलित हे संबोधन असले तरी व्यवस्थेने लादलेले हे दलितत्व झुगारून त्यापासून उन्नत होण्यासाठी राजा ढाले सातत्याने आग्रही राहिले.
दलित हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी वापरला नसला तरी तो त्यांना अमान्य होता, असे मात्र नाही; असे त्यांनी दलित साहित्य सेवक संघातर्फे १७ डिसेंबर १९५६ रोजी आयोजित साहित्य संमेलनाच्या स्वीकारलेल्या निमंत्रणावरुन दिसते. तथापि, तत्पूर्वीच त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांची साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सविस्तर भूमिका आपल्याला समजू शकली नाही, अशी खंत श्री. पवार यांनी व्यक्त केली.
Dr. Harish Bhalerao
अध्यक्षीय भाषणात डॉ. हरिष भालेराव म्हणाले, राजा ढाले यांनी माणुसकीचा पाणउतारा करणारी व्यवस्था नाकारण्याचे बळ शोषित समाजात निर्माण केले. दलित ही नकारात्मक ओळख करून देणारा शब्द आम्ही राजा ढाले यांच्याच प्रेरणेने नाकारला. वैचारिक चळवळ केल्याखेरीज प्रस्थापितांविरोधातील बंड यशस्वी होऊ शकत नाही, याची जाणीवनिर्मिती ढाले यांच्या सामाजिक-साहित्यिक चळवळीने केली, हे त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, रमेश शिपूरकर, प्रा. विनय कांबळे, नामदेवराव कांबळे यांच्यासह शहर व परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment