डॉ. निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
कोल्हापूर- दि. १ ऑक्टोबर: गांधीजींचा मार्ग अनुसरत असताना दुटप्पी भूमिका न घेता अहिंसा, सत्य ही त्यांची मूल्ये अंगिकारली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. विद्यापीठाच्या
वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या वतीने महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आणि विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांचे प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गांधीजींना कवेत घेणे सोपे नाही. त्यांनी दिलेली मूल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. गांधीजी केवळ एक व्यक्ती नव्हते, तर कृतिशील सत्यविचार होते. गांधीजींच्या तत्वांपासून प्रेरणा घेऊन त्या विचारांचा अवलंब करण्याची आणि आपण गांधीरूप होण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहे.
डॉ निशा मुडे-पवार यांच्या पुस्तकांतून विचार आणि सृजनशीलतेचा मिलाफ दिसून येतो, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले. या प्रसंगी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांनी डॉ. निशा मुडे-पवार लिखित 'वृत्तपत्रीय लेखनाची दोन दशके' या पुस्तकाविषयी अभिप्राय व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ रविंद्र ठाकुर यांनी 'सनीरेज' या काव्यसंग्रहाविषयी अभिप्राय व्यक्त केला. तर पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाचे चेअर प्रोफेसर डॉ. रत्नाकर पंडित यांनी 'संवादशास्त्र' या पुस्तकाविषयी अभिप्राय व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या अधिष्ठाता आणि गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांचे 'महात्मा गांधीजी यांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती' या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी दशरथ पारेकर होते. डॉ. भारती पाटील यांनी दक्षिण अफ्रिकेत 'इंडियन ओपिनीयन' ते 'हरीजन' या वृत्तपत्रांच्या प्रकाशन कालावधीतील गांधीजींच्या पत्रकारितेचा प्रवास कथित केला. गांधीजींवर संपादित १०० खंडांमध्ये गांधीजींनी संपादित केलेली ४ वृत्तपत्रे, पत्रे व इतर भाषणे या सामग्रीचा प्रामुख्याने समावेश केल्याचे सांगितले. गांधीजींच्या 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे यावर्षी शताब्दी वर्ष असल्याचे सांगून गांधीजींच्या विचारांचा त्यांनी आढावा घेतला.
या प्रसंगी शाहीर राजू राऊत यांनी पुस्तक प्रकाशनाबद्दल आपली काव्यात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. सचिन दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी डॉ. सुमेधा साळुंखे, अनुराधा इनामदार, सुधाकर बर्गे, रिमा पाटील, मानसी पोवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment