Thursday, 10 October 2019

अत्याधुनिक यंत्रणेमुळे छपाईस गतिमानता: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात अत्याधुनिक वेब ऑफसेट यंत्रणा कार्यान्वित; राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनचे फीत कापून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. व्ही.एन. शिंदे आदी.


शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनचे कळ दाबून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. डी.के. गायकवाड आदी.

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासोबत  कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. व्ही.एन. शिंदे आदी.


कोल्हापूर, दि. १० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या मुद्रणालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट यंत्रणेमुळे छपाईच्या कामाला गतिमानता प्राप्त होणार असून छपाईचा वेळ आणि कर्मचाऱ्यांचे श्रमही त्यामुळे वाचतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी (दि. ८) येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मुद्रणालयात विजयादशमीला अत्याधुनिक वेब ऑफसेट मशीनचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये वेब ऑफसेट मशीन बसविणारे शिवाजी विद्यापीठ पहिलेच ठरले आहे. या नव्या मशीनवर उत्तरपत्रिकांची तसेच पुस्तक छपाई विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. या यंत्रणेमुळे आता विद्यापीठाची मोनो-कलरची कामे बाहेरच्या मुद्रणालयांना न देता उलट आपली छपाईची कामे वेळेत संपवून आपल्याला बाहेरची कामे घेता येऊ शकतील का, या दृष्टीनेही पुढील टप्प्यात विचार करण्यास हरकत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर अत्याधुनिक मशीन जगप्रसिद्ध मनुग्राफ कंपनीचे असून सिटीलाईन-मोनो या प्रकारचे आहे. याचा वेग २० हजार ते ३० हजार प्रती प्रतितास इतका असून त्यावर एकरंगी छपाईची कामे अल्पावधीत आणि जलदगतीने होणार आहेत.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून आणि मशीन चालू करून उद्घाटन करण्यात आले. मनुग्राफ कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक मिलींद अभ्यंकर यांनी मशीनची सर्व माहिती उपस्थितांना दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, मुद्रणालय अधीक्षक भूषण पाटील यांच्यासह मुद्रणालयातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुद्रणालय विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment