Saturday, 19 October 2019

बुद्धिझम हे अस्वस्थतेचे तत्त्वज्ञान: डॉ. राजेंद्र कुंभार

डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या ‘प्रतित्यसमुत्पाद’ पुस्तकाचे प्रकाशन




डॉ. ज.रा. दाभोळे लिखित 'प्रतित्यसमुत्पाद' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. दाभोळे, डॉ. दीपा श्रावस्ती.

डॉ. ज.रा. दाभोळे लिखित 'प्रतित्यसमुत्पाद' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. ज.रा. दाभोळे, डॉ. दीपा श्रावस्ती.

Dr. Rajendra Kumbhar
कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: बुद्धाचे तत्त्वज्ञान (बुद्धिझम) हे अस्वस्थतेतून उदयास आलेले तत्त्वज्ञान असून मानवी दुःखनिवारणासाठी ते मुळापासून समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंर्दाच्या वतीने ज्येष्ठ तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे लिखित प्रतित्यसमुत्पाद या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुंभार बोलत होते. विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. कुंभार म्हणाले, बुद्ध तत्त्वज्ञानाचा उगम हा सिद्धार्थाच्या अस्वस्थतेमधून झाला. जगातील दुःख पाहून व्यथित झालेला संवेदनशील मनाचा सिद्धार्थ दुःखनिवारणाचा मार्ग शोधण्यासाठी राजप्रासादातून बाहेर पडला आणि पुढे त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर त्याने ज्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली, त्याच्या मुळाशी ही अस्वस्थता आहे. त्यामुळे विपश्यनेच्या मार्गाने बुद्ध तत्त्वज्ञानाची अनुभूती घेऊ पाहणाऱ्यांची खरे तर कीव करावीशी वाटते. निब्बाणाच्या संदर्भातही व्यक्तीगत आणि सामूहिक निब्बाण असे दोन प्रकार आहेत. तथापि, व्यक्तीगत स्तरावर निब्बाण प्राप्त करवून घेणे शक्य असले तरी इतर त्यापासून वंचितच राहात असल्यामुळे व्यक्तीगत निब्बाणामध्ये स्वार्थ आहे. सामूहिक निब्बाणामध्ये मात्र तसे नाही. त्यामुळे व्यापक जनसमुदायाचे हित साधणारे निब्बाण हेच खरे निब्बाण होय, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय परंपरेमधील नऊपैकी सहा दर्शने ही नास्तिक असल्याने भारतीय परंपरा व तत्त्वज्ञान हे मूलतः नास्तिक आहे. पाश्चात्य, वाळवंटी तसेच जंगली संस्कृती या आध्यात्मिक आहेत, पण भारतातील सुबत्ता आणि संपन्नता यांमुळे येथे नास्तिकवाद निर्माण झाल्याचे दिसते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Dr. J.R. Dabhole
यावेळी ज्येष्ठ तत्त्वज्ञ डॉ. ज.रा. दाभोळे म्हणाले, अस्मिन सति, इदं भवति अर्थात हे असेल, तर ते घडते, असे हे बुद्धाचे प्रतित्यसमुत्पादाचे तत्त्वज्ञान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट घडते, त्याला काहीतरी कार्यकारणभाव असतो. हा प्रतित्यसमुत्पाद किंवा पाली भाषेत ज्याला पटिच्चसमुप्पाद म्हणतात, ते कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही, असे सांगतानाच अनित्यवाद आणि अनात्मवाद सिद्ध करणारे तत्त्वज्ञान आहे. बुद्धाने या तत्त्वज्ञानाची मांडणी करतानाही मध्यममार्गाचाच स्वीकार केल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे बुद्धाला केवळ तात्विक काथ्याकूट करण्यात रस नव्हता, तर अखिल मानवजातीला त्याला शोषणमुक्त करावयाचे होते, दुःखमुक्त करावयाचे होते. त्याने दुःखनिवारणाचा अष्टांगमार्ग त्यासाठीच दर्शविला आहे. श्रमण परंपरा ही वैदिक परंपरेहूनही भारतातील सर्वात प्राचीन परंपरा आहे. तीमध्ये बौद्ध आणि जैन परंपरांचा समावेश आहे. या प्राचीन परंपरेच्या तत्त्वज्ञानाचा प्रतित्यसमुत्पाद हा एक महत्त्वाचा भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. दाभोळे यांनी सन १९५३ साली आपण विद्यार्थी दशेत कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकत्र आले असताना त्यांची भेट झाल्याची आठवण सांगितली. बाबासाहेबांकडे स्वाक्षरी-संदेश मागितला असता त्यांनी ‘Be a human throughout your life’ (आयुष्यभर चांगला माणूस म्हणून राहा), असा संदेश दिल्याचे सांगितले. कर्मवीरांमुळेच आपल्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची ओळख झाल्याचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन म्हणाले, डॉ. ज.रा. दाभोळे यांनी बुद्ध तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित अशा प्रतित्यसमुत्पादाचे विश्लेषण करणारे पुस्तक लिहीले आहे. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर पडली आहे. हे तत्त्वज्ञान मुळापासून समजून घेण्यासाठी दाभोळे सरांचे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. दीपा श्रावस्ती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. रविंद्र श्रावस्ती, प्रा. विनय कांबळे, आर. वाय. लिधडे, डॉ. यु.के. सकट, डॉ. ए.व्ही. मोहोळकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment