Wednesday 23 October 2019

विदेशी भाषा विभागाच्या दहा विद्यार्थिनींचे

आंतरराष्ट्रीय जपानी परीक्षेत यश

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात आंतरराष्ट्रीय जपानी परीक्षेत लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर स्नेहल शेट्ये, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. मेघा पानसरे.


शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात आंतरराष्ट्रीय जपानी परीक्षेत लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात यशस्वी विद्यार्थिनींसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत डॉ. मेघा पानसरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि स्नेहल शेट्ये.

कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या दहा विद्यार्थिनींनी ‘जपानी भाषा प्राविण्य चाचणी परीक्षा’ (जे.एल.पी.टी.) या जपानी भाषेतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले. या विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व कुलसचिव डॉ. विलास नांदडवेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ काल (दि. २२) सायंकाळी झाला.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी भारतीय संस्कृती व जपानी संस्कृती यातील साम्य अधोरेखित केले. ते म्हणाले, जपानी संस्कृती, तेथील दृढ नातेसंबंध आपल्याला भारतीय संस्कृतीची आठवण करून देतात. कोणतीही विदेशी भाषा शिकल्याने आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. आपल्याला त्या भाषेची केवळ माहितीच होत नाही, तर त्या देशाचे लोक आणि त्यांचे जनजीवन आतून समजू लागतात. या प्रसंगी त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील भाषा कौशल्य प्राप्त करण्यासाठी  सदिच्छा दिल्या.
यावेळी विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी विद्यापीठाने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. जपान व भारतातील आर्थिक परस्परसंबंध अधिकाधिक दृढ होत असल्याने अनेक जपानी कंपन्या भारतात आल्या आहेत. त्यातून जपानी भाषेच्या विद्यार्थ्यांना करियरमध्ये रोजगाराच्या  अनेक संधी उपलब्ध होतात. विदेशी भाषा विभागमध्ये रशियन, जर्मन, जपानी भाषांचे सर्टिफिकेट कोर्स शिकविले जातात. यावर्षी जपानी भाषा डिप्लोमा व पोर्तुगीज भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरु झाले आहेत. तसेच पुढील वर्षीपासून फ्रेंच भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरु होणार आहे.

विद्यार्थिनींचे लक्ष्यवेधी यश
‘जपान फाऊंडेशन’ आणि ‘जपान एज्युकेशनल एक्स्चेंजेस अँड सर्व्हिसेस’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जपानी भाषा प्राविण्य चाचणी परीक्षा’ घेतल्या जातात. यातील N5 परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील दहा विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य मिळविले. या विद्यार्थिनींना विभागामार्फत दोन महिने विनाशुल्क विशेष मार्गदर्शन देण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींमध्ये अस्मिता मिराशी, प्राजक्ता गुरव, दीपिका भोसले, मेहजबीन शेख, गौरी सूर्यवंशी, श्वेता पुरी, पूर्वा नाडगोंडा, रुचा शिंदे, सिमरन कदम व सायली तळवडेकर यांचा समावेश आहे. पूर्वा नाडगोंडा या विद्यार्थिनीने स्वत:ची नोकरी व कुटुंब सांभाळत ९४% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले.

जपानी भाषा शिक्षिका स्नेहल शेट्ये यांनी आभार मानले. यावेळी मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment