शिवाजी विद्यापीठात विविध फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.एस. पाटील. |
'सारथी' फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांचा विद्यापीठात गौरव
कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: आपल्या संशोधनाने एकूण सामाजिक
ज्ञानामध्ये नेमकी काय भर टाकली, कोणते योगदान दिले, या बाबीकडे संशोधकांनी गांभीर्यपूर्वक
लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील सुमारे ४८ संशोधक
विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व
मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) विविध फेलोशीपसाठी निवड झाली आहे. राज्यात
सर्वाधिक संख्येने या संशोधनवृत्ती प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठातर्फे या
विद्यार्थ्यांसह अन्य विविध योजनांखाली फेलोशीपप्राप्त ५७ विद्यार्थ्यांचा गौरव
समारंभ आज राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाच्या
प्रयोजनाबद्दल अवगत केले. ते म्हणाले, आपण संशोधन कशासाठी करतो आहोत, यासंदर्भातील
संकल्पना व कल्पना संशोधकाच्या मनात स्पष्ट असल्या पाहिजेत. आपल्या संशोधनाने
सामाजिक ज्ञानामध्ये थोडी का असेना भर पडली पाहिजे, याकडे आपला कटाक्ष असला
पाहिजे. संशोधनाकडे आव्हान म्हणून पाहात असतानाच उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर
करून त्याअंतर्गत हाती घेतलेल्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न
करायला हवेत. त्याअंतर्गत ज्ञान शोधण्याची कला अवगत करणे, विकसित करणे, सशक्त
निरीक्षण कौशल्याचा विकास करणे या गोष्टीही संशोधन प्रक्रियेतूनच आपल्याला साध्य करता
येतात. त्यातून अंतिमतः काही निष्कर्षाप्रत आपण जाऊ शकतो. आपल्याला मिळालेल्या
संशोधनवृत्तीचे योग्य प्रकारे नियोजन, व्यवस्थापन करण्याचे कौशल्यही संशोधक
विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्या संशोधनांतर्गत शोधलेल्या
नवसंकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विद्यापीठाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्रामार्फतही
प्रयत्न करावेत, असे आवाहनही कुलगुरूंनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, वरिष्ठ
संशोधक विद्यार्थ्यांनी खालील वर्गांत शिकण्यासाठी दाखल झालेल्या
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
विद्यापीठ स्तरावरील दर्जेदार संशोधनाचा वारसा पुढील विद्यार्थ्यांमध्ये त्या
माध्यमातून झिरपत राहील आणि विद्यापीठीय संशोधनाचा दर्जा अबाधित राहील. संशोधक
विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक, प्रशासकीय समस्यांतून जावे लागते.
त्यात त्यांचा वेळ जाऊ नये, यासाठी त्यांच्यासमवेत त्रैमासिक बैठका घेऊन चर्चा
करून त्यांवर तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी सिंगल विंडो सदृश काही व्यवस्था
निर्माण करता येईल का, या दृष्टीनेही चाचपणी करता येईल.
यावेळी अरविंद पाटील (भौतिकशास्त्र) व प्रवीण
शेंबडे (भूगोल) या संशोधक विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. या
कार्यक्रमाचे स्वागत विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील
यांनी केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्यशील यादव यांनी
सूत्रसंचालन केले, तर उपकुलसचिव संजय कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालये व
विद्यापीठ विभागातर्फे कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
फेलोशीपप्राप्त संशोधक विद्यार्थ्यांची संख्या
अशी-
‘सारथी’ योजनेअंतर्गत मा. मुख्यमंत्री विशेष संशोधन
फेलोशीप-२०१९ (१६ विद्यार्थी), ‘सारथी’ राष्ट्रीय संशोधन फेलोशीप-२०१९ (३२ विद्यार्थी); अन्य विविध फेलोशीपप्राप्त
(५७ विद्यार्थी) - एकूण १०५ विद्यार्थी.
No comments:
Post a Comment