पंचगंगा घाटाच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय योगदान देताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
पंचगंगा घाट स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवक. |
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवक. |
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवक. |
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्वयंसेवक. |
कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ७५०
स्वयंसेवकांनी आज येथील पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविताना दिवसभरात सुमारे
२० टन कचरा साफ केला. महापुराच्या पाण्याने काठावर आणून टाकलेल्या कचऱ्याचा उठाव
झाल्याने काही तासांतच घाटाचा परिसर चकाचक झाला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या प्रमुख
उपस्थितीत आज सकाळी नऊ वाजता पंचगंगा घाट परिसराच्या स्वच्छता मोहिमेचे औपचारिक
उद्घाटन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी स्वतः हातात खोरे
घेऊन एनएसएस स्वयंसेवकांच्या साथीने स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या
मोहिमेमध्ये सातारा जिल्ह्यातून आलेल्या स्वयंसेवकांसह स्थानिक अशा सुमारे ७५०
स्वयंसेवकांनी ४० कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सहभाग घेतला.
प्लास्टीक साहित्य, झाडेझुडपे, काचेच्या बाटल्या, तसबिरी, तुटक्या-फुटक्या मूर्ती,
नदीला अर्पण केलेले नारळ, गाळ-चिखल आदी प्रकारच्या मलब्याची स्वच्छता करण्यात आली.
पंचगंगा घाट परिसराबरोबरच राजाराम बंधारा, पंचगंगा स्मशानभूमी या परिसरातही
स्वच्छता करण्यात आली. त्या ठिकाणाहूनही अनुक्रमे पाच आणि दोन टन अशा एकूण सात टन
कचऱ्याचा उठाव करण्यात आला. शहरातून घाटाकडे येणाऱ्या गंगावेश ते शिवाजी पूल
रस्त्यासह पाणंद रस्ता, तोरस्कर चौक या ठिकाणीही स्वच्छता करण्यात आली. या
परिसरातूनही सुमारे दोन टन प्लास्टीक कचऱ्याचा उठाव करण्यात आला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत रंकाळा तलाव परिसरात राबविण्यात आलेल्या
स्वच्छता मोहिमेअंतर्गतही सुमारे वीस टन कचरा उचलण्यात आला आहे. या सर्व
मोहिमेदरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाकडूनही मोठे सहकार्य
लाभल्याचे डॉ. डी.के. गायकवाड यांनी सांगितले.
पाच दिवसांत शहर परिसरासह ११ गावांत मोहीम
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत दि. २६ ऑगस्टपासून
कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यातील पूरबाधित ११ गावांत स्वच्छता मोहीम राबविण्यात
आली. त्यामध्ये नृसिंहवाडी, अर्जुनवाड, औरवाड, राजापूर, खिद्रापूर, आलास, कवठेगुलंद,
कनवाड, घालवाड, गणेशवाडी, अब्दुललाट या गावांचा समावेश राहिला. या मोहिमेत
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ८०० विद्यार्थी आणि ४०० विद्यार्थिनी अशा
सुमारे १२०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे सांगली व सातारा
जिल्ह्यांतील विविध पूरग्रस्त ठिकाणी सुद्धा नजीकच्या महाविद्यालयातील एनएसएसच्या
स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेबरोबरच सर्वेक्षण आणि समुपदेशनाचे
कार्यही या स्वयंसेवकांनी केले, अशी माहिती डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.
No comments:
Post a Comment