शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी भरून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या टँकरसह अन्य वाहनांची रांग |
शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याचे पाणी घेऊन जाण्यासाठी जमलेले नागरिक. |
शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी भरून घेणारे महानगरपालिकेचे टँकर |
कोल्हापूर, दि. १४ ऑगस्ट: कोल्हापूर
शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट ओळखून गेल्या चार दिवसांत शिवाजी
विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रामधून सुमारे दहा लाख लीटरहून अधिक पाणी शहरवासीयांना
उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे
दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात झालेली
अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी महानगरपालिकेची जल शुद्धीकरण
यंत्रणा पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे सभोवती पुराचे पाणीच पाणी
असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील ही
परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका
प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पालिकेच्या टँकरसह
त्यांनी भाड्याने घेतलेल्या टँकरमधून शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे.
यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत दिवसाला सरासरी
दोन ते अडीच लाख लीटर या प्रमाणे आतापर्यंत सुमारे दहा लाख लीटरच्या घरात
पाणीपुरवठा करण्यात विद्यापीठ व पालिका प्रशासनाला यश लाभले आहे.
या संदर्भात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने गेल्या
चार वर्षांत ‘जलयुक्त विद्यापीठ’ ही
संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. तीन मोठे
जलाशय, आठ विहीरी सहा शेततळी आदींच्या माध्यमातून सुमारे चाळीसा कोटी लीटरची साठवण
क्षमता निर्माण करण्यात यशस्वी झालेले शिवाजी विद्यापीठ गेल्या दोन वर्षांत
पाण्याच्या संदर्भात पूर्णतः स्वयंपूर्ण झाले आहे. पूर्वी पाण्यासाठी
महापालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून असणारे विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून
पालिकेकडून पाणी घेत नाही. यामुळे विद्यापीठाच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे.
त्यापुढे जाऊन विद्यापीठाने आपल्या कॅम्पसवर आर.ओ. जल शुद्धीकरण प्रकल्प
कार्यान्वित केला. यामुळे कॅम्पसवर कुलगुरूंपासून ते उपाहारगृहात आलेल्या
अभ्यागतापर्यंत प्रत्येकाला समान दर्जाचे शुद्ध पाणी प्यावयास मिळते. या
पार्श्वभूमीवर, यंदा विद्यापीठाने महापूर स्थितीत पाणीटंचाईग्रस्त असलेल्या
कोल्हापूर शहराला आपल्या क्षमतेनुसार दिवसाला सरासरी दोन ते अडीच लाख लीटर इतके
शुद्ध पाणी पुरविण्यात यश मिळविले आहे. महापालिकेच्या टँकरसह सर्वसामान्य
नागरिकांची सुमारे चारशे ते पाचशे वाहने कॅम्पसवरुन दैनंदिन पिण्याचे पाणी घेऊन
जात आहेत. या आपत्तीच्या परिस्थितीत शहरवासियांना पाणी पुरवून दिलासा देऊ शकलो,
याचे मोठे समाधान आहे.
शिवाजी विद्यापीठाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासही मोठा
हातभार लावल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर
आल्याने आणि तेथील पिकेच्या पिके पाण्याखाली गेल्याने मुक्या जनावरांचा
चारा-वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या चार
दिवसांत सुमारे चाळीस ट्रॉली इतका चारा विद्यापीठाच्या कॅम्पसवरुन आपत्तीग्रस्त
भागातील जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सुविधा
पुरविण्याच्या दृष्टीनेही विद्यापीठ आपल्या शिव सहायता- आपत्ती निवारण कक्षाच्या
माध्यमातून प्रयत्नशील असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment