Monday, 19 August 2019

फॉर्चुनकोट, कझनकॅटसॉल कंपन्यांसमवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाने आज कझनकॅटसॉल प्रा.लि. कंपनीसमवेत सामंजस्य करार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डॉ.टी. शिर्के यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि कंपनीचे पंकज देशपांडे व मकरंद पंडित. सोबत (डावीकडून) डॉ. के.एम. गरडकर, डॉ. एस.एस. कोळेकर, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.एस. भांगे.


शिवाजी विद्यापीठात सोमवारी फॉर्चुनकोट कंपनीसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व कंपनीचे डॉ. संदेश काणेकर. सोबत (डावीकडून) डॉ. के.एम. गरडकर, डॉ. एस.एस. कोळेकर, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. डी.एस. भांगे, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. ए.एम. गुरव आदी.

कोल्हापूर, दि. १९ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने आज फॉर्चुनकोट आणि कझनकॅटसॉल या कंपन्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
फॉर्चुनकोट ही कंपनी एन्टीमायक्रोबियल पेंट निर्मिती क्षेत्रात तर कझनकॅटसॉल ही साखर कारखान्यांतील बॉयलरमधील इंधनाची क्षमतावर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे.
फॉर्चुनकोट कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य कराराअन्वये शिवाजी विद्यापीठात नॅनोमूलद्रव्ये आधारित मायक्रोबियल पेंट्सची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. एन्टीमायक्रोबियल पेंट्स हे नवीन तं६ज्ञान असून त्यांचा मुख्य उद्देश पेंट्सच्या इतर गुणधर्मासोबत सूक्ष्म जीवजंतूंचा प्रसार रोखून त्यांना नष्ट करणे असतो. या नॅनो मूलद्रव्याधारित जंतूनाशकांची सूक्ष्मजीव प्रतिबंध किंवा नष्ट करण्याची प्रक्रिया ही सूक्ष्म जीवजंतू सदर मूलद्रव्याच्या संपर्कामुळे अगर अतिसूक्ष्म आकारामुळे सुलभरित्या सूक्ष्मजीवाच्या शरीरात घुसल्यामुळे होतो. त्यामुळे सदर जंतूनाशकास न जुमानणाऱ्या सुपरबग्जच्या निर्मितीसही अटकाव होतो. साहजिकच अनेक संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांना प्रतिबंध होतो. त्यासंदर्भातील संशोधन विद्यापीठात करण्यात येत आहे, अशी माहिती संशोधक डॉ. एस.डी. डेळेकर यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे संशोधक डॉ. डी.एस. भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कझनकॅटसॉल कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य करारान्वये विद्यापीठात साखर कारखान्यांच्या बॉयलरच्या धुराड्यांमध्ये तयार होणाऱ्या काजळीचे प्रमाण कमी करण्याबरोबरच इंधनाची ज्वलनक्षमता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंधनामध्ये मिसळण्यासाठी अशा प्रकारचे उत्प्रेरक तयार करण्यात येणार आहेत की जेणे करून बॉयलरमधील ज्वलनावेळी नायट्रोजन व सल्फरचे जे विविध प्रकारचे वायू प्रदूषक तयार होतात, त्यांचे प्रमाण कमी होईल. हे तंत्रज्ञान विकसित करून संबंधित कंपनीमार्फत कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. यामुळे साखर कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि इंधनाची ज्वलनक्षमताही वाढेल.
सदरचे दोन्ही संशोधन प्रकल्प आणि सामंजस्य करार हे अत्यंत समाजोपयोगी असल्याचे सांगून प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे हे दोन्ही सामंजस्य करार उत्तम उदाहरण असून विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या समाजोपयोगी संशोधनाचे प्रतीक आहेत. उद्योगांची गरज भागविण्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने दोन्ही करारांचे आदर्श करार म्हणून अभिनंदन करावेसे वाटते. या दोन्ही करारांमधून अगदी बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळविण्याइतक्या महत्त्वाच्या संशोधनाची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनीही हे करार म्हणजे संशोधनाची उत्तम संधी असून समाजाच्या दृष्टीने विद्यापीठीय संशोधन किती महत्वाचे ठरू शकते, याचे उदाहरण असल्याचे सांगितले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. कामत आदींनीही या सामंजस्य कराराचे स्वागत करणारी मनोगते व्यक्त केली.
सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आणि फॉर्चुनकोट कंपनीच्या वतीने डॉ. संदेश काणेकर यांनी तर कझनकॅटसॉल कंपनीच्या वतीने पंकज देशपांडे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी या कंपनीचे मकरंद देशपांडेही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment