Saturday, 17 August 2019

पूरबाधित महाविद्यालयांचे नुकसान पाहून गहिवरले कुलगुरू!

सांगली सेथील श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेमधील नुकसानीची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी


सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयातील फर्निचर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनाची झालेली दुरवस्था पाहताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

कुरुंदवाड येथील एस.के. पाटील महाविद्यालयातील कार्यालयाची झालेली दुरवस्था.

कुरुंदवाड येथील एस.के. पाटील महाविद्यालयातील कार्यालयाची झालेली दुरवस्था पाहताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


सांगली, कुरुंदवाडच्या चार महाविद्यालयांची केली पाहणी
कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: महाविद्यालयांच्या भिंतींवर महापुराच्या दहा-बारा फुट उंचीच्या तांबड्या-करड्या ओलेत्या खुणा... फरशांवर जमिनीवर मातकट चिखलाचा थर... वर्गखोल्यांतील भिजून मोडलेले बेंच... कार्यालयीन साहित्याचे झालेले प्रचंड नुकसान... प्रयोगशाळांतील साहित्याची झालेली प्रचंड नासधूस... ग्रंथालयांतील कपाटांमध्ये अक्षरशः कुजलेली दुर्मिळ पुस्तकं... परिसरात सर्वत्र भरून राहिलेला कुजट, कुबट वास... अशी काळजाला पिळवटून टाकणारी दृश्यं पाहून काल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना गहिवरुन आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल महापुराने ग्रस्त झालेल्या सांगली आणि कुरुंदवाड येथील महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. काल दिवसभरात कुलगुरूंनी सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, मथुबाई गरवारे महाविद्यालय आणि कुरुंदवाड येथील स.का. पाटील महाविद्यालय या चार महाविद्यालयांना भेटी दिल्या.
सांगलीतील बसस्थानक परिसरातील मथुबाई गरवारे महाविद्यालयाचे पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तळमजल्यावरील प्राचार्यांच्या दालनासह कार्यालय, वर्गखोल्या, उपाहारागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी ठिकाणी पूर्णतः पाणी भरले होते. त्यामुळे लाकडी टेबल-खुर्च्या आदी सामानासह काचसामान, संगणक आदी पायाभूत सुविधांची मोठी नासधूस झाली आहे. वर्गातले बेंच आणि लाकडी सामान तर पाण्याने कुजून खराब झाले आहे. गरवारे महाविद्यालयाचे मधले प्रांगण या खराब झालेल्या साहित्याने भरून गेले आहे आणि अद्यापही ते बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. इथल्या तळमजल्यावरील ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची झालेली दुरवस्था पाहून कुलगुरू डॉ. शिंदे यांना खूप गहिवरुन आले. प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी यांचे सांत्वन करीत असताना ते अचानकपणे निःशब्द, स्तब्ध झाले. त्यानंतर केवळ त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थोपटून दिलासा देत राहिले.
अशीच अवस्था कुरुंदवाडच्या एस.के. पाटील महाविद्यालयाच्या भेटी प्रसंगीही झाली. महाविद्यालयाचा संपूर्ण तळमजला आठवडाभर पाण्याखाली होता. इथेही कार्यालय, वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर कालच सकाळी महाविद्यालयाचा तळमजला उघडून कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. तथापि, पाणी चढत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी शक्य तितके कार्यालयीन दप्तर, कागदपत्रे, ग्रंथ आदी साहित्य उंचावर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे भेटीप्रसंगी लक्षात येत होते. तरीही झालेले नुकसान दाखविताना कर्मचाऱ्यांना हुंदका आवरत नव्हता. विशेष म्हणजे तळमजला पाण्यात गेल्याचे दुःख असतानाही वरच्या दोन मजल्यांवर सुमारे हजारभर पूरग्रस्तांसाठी निवारा कॅम्प महाविद्यालयाने या काळात चालविला, याबद्दल कुलगुरू डॉ. शिंदे यांनी प्राचार्य डॉ. टी.के. जाधव यांचे विशेष अभिनंदन केले. अद्यापही अनेक बाधित नागरिक येथील कॅम्पमध्ये आहेत.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगलीवाडी येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला भेट दिली. आयर्विन पुलापासून अगदी नजीक असलेल्या या महाविद्यालयाच्या तळमजल्यावर पुराचे पाणी घुसले होते. तरीही प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातल्या सुमारे तीन हजार पूरग्रस्तांची वरच्या मजल्यांवर सोय केली. पुराचे पाणी ओसरेपर्यंत परिसरातल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आश्रयस्थान म्हणून या महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.
शहरातल्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील संगणक कक्ष, रसायनशास्त्र प्रयोगशाळा आणि त्याशेजारच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. प्राचार्य डॉ. व्ही.बी. कोडग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून शक्य तितके संगणक वरच्या मजल्यांवर हलविल्याने नुकसानीची तीव्रता कमी झाली. मात्र, अद्यापही या साऱ्या खोल्यांमध्ये ओलसरपणा आणि कुबट वास भरून राहिला आहे. या महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यांवरही हजारहून अधिक पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा कॅम्प चालविण्यात आला.

सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एनएसएस व एससीसी कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. डी.जी. कणसे, अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. सी.टी. कारंडे, विशाल गायकवाड, संजय परमणे आदी.

विद्यापीठात कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठात कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, सहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरुपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर, सांगली परिसरात आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सुमारे दहा महाविद्यालयांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्या महाविद्यालयांना मी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठ स्तरावरुन नेमकी कशा स्वरुपाची मदत करता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या संदर्भातील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सांगली शहर-जिल्ह्यातही स्वच्छता मोहीम
महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेल्या सांगली शहरासह जिल्ह्यातही राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील समन्वयकांना केले. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कुलगुरूंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एनएसएस, एनसीसी समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
स्वच्छता मोहीम राबविताना स्वयंसेवकांना मास्क, हातमोजे, गमबूट आदी आवश्यक साहित्य उपलब्ध करवून देण्यात यावे. तसेच, त्यांच्या आरोग्याची पूर्ण खबरदारी घेऊनच स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, डिग्री प्रमाणपत्रे आदींचे पुरामुळे नुकसान झाले असेल, त्यांनी योग्य पुरावे प्रदर्शित केल्यास त्यांना सदर कागदपत्रे विद्यापीठाकडून मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. डी.जी. कणसे, डॉ. सी.टी. कारंडे, अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. संजय ठिगळे, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, डॉ. बी.व्ही. ताम्हणकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएसएस व एनसीसी समन्वयक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment