Friday, 2 August 2019

अण्णाभाऊंचे साहित्य चिरंतन: डॉ. मेघा पानसरे


विद्यापीठात शाहिरी जागराद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे आयोजित 'शाहिरी जागर' कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. मेघा पानसरे. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह सहभागी शाहीर.

शिवाजी विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे आयोजित 'शाहिरी जागर' कार्यक्रमात सादरीकरण करताना शाहीर देवानंद माळी.


कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट: साहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने शाहिरी जागर या विशेष शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वि.स. खांडेकर भाषा भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पानसरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे होते तर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पानसरे म्हणाल्या, महाराष्ट्राची शाहिरी परंपरा अण्णाभाऊंनी अधिक संपन्न, अधिक उन्नत केली. वंचित, श्रमिक समाजाच्या प्रबोधनाशी जोडत शाहिरीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. वाटेगाव ते रशिया व्हाया मुंबई ही त्यांची उत्तुंग भरारी विस्मयकारक होती. परिस्थितीचे भान आणि संवेदनशीलता हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे गुणविशेष होते. परिस्थिती आणि शोषितांचे जीवन बदलून टाकण्यासाठी त्यांनी सातत्याने विचारमंथन घडवून आणले आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटल्याचे दिसते. प्रचलित अभिजन साहित्यात स्थान नसलेल्या वर्गाचा अवकाश साहित्याच्या परीघात त्यांनी निर्माण केले. त्यांचे गुरू मॅक्झिम गॉर्की यांच्याप्रमाणेच कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता, परिस्थितीशी दोन हात करीत उभ्या राहिलेल्या अण्णाभाऊंनी जग हेच त्यांचे विद्यापीठ मानले. सामाजिक दांभिकतेवर सातत्याने प्रहार केले. राज्याच्या पातळीवर माझी मैना गावाकडं राहिली... लिहीणाऱ्या अण्णाभाऊंनी राष्ट्रीय पातळीवर बंगालची हाक ऐकून तिला ओ दिली, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संचार करीत असताना स्टालिनग्राडचा पोवाडा रचला. साहित्याच्या क्षेत्रात स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचा आवाका असणारा साहित्यिक आजच्या काळातही दुर्मिळ आहे.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. सरवदे यांनी अध्यक्षीय भाषणात अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रस्तुतता आजच्या काळातही कमी झालेली नसून उलट वाढलेलीच असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
शाहीरांनी गाजविला दिवस
शिवाजी विद्यापीठातला आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने शाहिरांनी गाजविला. शाहीर देवानंद माळी (सांगली), शाहीर डॉ. आझाद नायकवडी (कोल्हापूर), शाहीर बाबूराव कांबळे (कांडगाव), शाहीर संजय जाधव (इचलकरंजी), शाहीर सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि शाहीर नुपूर व राजवैष्णवी वायदंडे यांनी शाहिरी जागर या कार्यक्रमांतर्गत एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. तर, उपस्थितांमध्येही शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलाप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.
डॉ. आझाद नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून अण्णाभाऊंची जग बदल घालुनी घाव आणि साहीर आत्माराम पाटील यांची एका धरतीच्या पोटी हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाची एकदम दमदार सुरवात करून दिली. त्यानंतर शाहीर देवानंद माळी यांनीही त्यांच्या नेहमीच्या जोशात गण आणि अण्णाभाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. त्यानंतर दिवसभरात शाहीर बाबूराव कांबळे, शाहीर संजय जाधव, शाहीर नुपूर व राजवैष्णवी वायदंडे या भगिनी आणि शाहीर सदाशिव निकम यांनीही अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले.



No comments:

Post a Comment