Tuesday, 27 August 2019

‘एनएसएस’कडून पूरग्रस्त गावांत १ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता मोहीम

शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत आजपासून स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या मोहिमेसाठी सातारा जिल्ह्यातून दाखल झालेल्या स्वयंसेवकांसमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड आदी.


शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत आजपासून स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या मोहिमेसाठी सातारा जिल्ह्यातून दाखल झालेल्या स्वयंसेवकांसमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड आदी.

सातारा जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांचे ६५० स्वयंसेवक सहभागी

कोल्हापूर, दि. २७ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोल्हापूर शहरातील पूरस्थिती ओसरलेल्या क्षणापासून शहरात महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यानंतर आता परिसरातील पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिमेसह समुपदेशन, सर्वेक्षण आदी कामांमध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार असून यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे सातारा जिल्ह्यातील एनएसएसचे सुमारे ६५० स्वयंसेवक आणि २५ कार्यक्रम अधिकारी सहभागी होत आहेत. त्या सर्वांनी पूरग्रस्त गावांमध्ये सेवाभावी पद्धतीने काम करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पूरग्रस्त गावांकडे निघालेल्या एनएसएस स्वयंसेवकांना कीट वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड, अर्जुनवाड, कवठेगुलंद, गणेशवाडी, बुबनाळ, शेडबाळ, अब्दुललाट, टाकवडे, नृसिंहवाडी, खिद्रापूर आणि कुरुंदवाड ही पूरग्रस्त गावे स्वच्छता, सर्वेक्षण आणि समुपदेशनासाठी दत्तक घेतली आहेत. तेथे ग्रामस्वच्छता, शाळांसह शासकीय इमारतींची स्वच्छता, मदत वाटप आणि अन्य अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. आजपासून १ सप्टेंबरपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणासह पूरबाधित ग्रामस्थांचे समुपदेशन करून आपत्तीच्या धक्क्यातून त्यांना सावरण्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह रोटरी व इनरव्हील क्लब, कोल्हापूर यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. वुई-केअर या संस्थेने एनएसएस स्वयंसेवकांना गमबूट, मास्क, हातमोजे, औषधांचे कीट आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवकांची ने-आण करण्यासाठी सहा एसटी बसेसचीही सोय केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी यावेळी दिली.
या मोहिमेत सातारा जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांतील प्रत्येकी ५० एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. ही महाविद्यालये अशी- एस.बी.एम. महाविद्यालय, रहिमतपूर, वाय.सी. महाविद्यालय, कराड, डी.जी. महाविद्यालय, सातारा, म.ह. शिंदे महाविद्यालय, मेढा, मुधोजी महाविद्यालय, फलटण, एन.एस.बी. महाविद्यालय, फलटण, एस.पी. महाविद्यालय, लोणंद, एस.आर.एम. महाविद्यालय, खटाव, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, पाचवड, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, सातारा, एस.जे. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, वाघोली, कला वाणिज्य महाविद्यालय, वाठार स्टेशन, पी.एस. कदम कला वाणिज्य महाविद्यालय, देऊर.

तीनही जिल्ह्यांत मोहिमा: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा या तीनही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व समन्वयकांच्या बैठका घेऊन पूरग्रस्त भागांत स्वच्छता मोहिमा व शिबिरे घेण्याचे ठरविले. त्यानुसार कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतही विविध महाविद्यालयांचे चमू आपल्या शेजारच्या पूरग्रस्त विभागात, गावांत अशा प्रकारच्या मोहिमा राबवित आहेत. एनएसएसच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन दिलासा देण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करीत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या संदर्भात व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment