Saturday, 3 August 2019

वैश्विक भान जपणाऱ्या साहित्यनिर्मितीची गरज: डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. राजन गवस, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सलीम मुल्ला, डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे.


शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे आयोजित साहित्यिकांच्या सत्कार समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मकांत देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि डॉ. राजन गवस यांच्यासमवेत (डावीकडून) साहित्यिक दत्ता घोलप, सुशीलकुमार शिंदे, किरण गुरव, सलीम मुल्ला, डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे.


कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रही असणाऱ्या आणि वैश्विक भान जपणाऱ्या साहित्याची निर्मिती होत राहणे आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस प्रमुख उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्या साहित्यिकांमध्ये बालसाहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला (जंगल खजिन्याचा शोध- कादंबरी), युवा साहित्य पुरस्कार विजेते सुशीलकुमार शिंदे (शहर आत्महत्या करायचं म्हणतंय- कवितासंग्रह), मराठवाडा साहित्य परिषदेचा बी. रघुनाथ पुरस्कार विजेते किरण गुरव (जुगाड- कादंबरी), परिषदेचाच म.भि. चिटणीस पुरस्कार विजेते दत्ता घोलप (मराठी कादंबरी: आशय आणि आविष्कार- समीक्षाग्रंथ) यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते शाल, ग्रंथ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, आजच्या परिस्थितीत मूल्यभान ठेवून, शांतपणे, तटस्थपणे सत्याचा शोध घेणाऱ्या साहित्यिकांची आज नितांत गरज आहे. पुस्तके जशी जगण्याचे भान देतात, तशीच ती लेखकाच्या मनाचा आरसा म्हणूनही काम करतात. लेखकाचे विस्तृत अनुभवविश्व त्याला वैश्विक संवेदनांचा हुंकार बनायला भाग पाडतात, ज्याच्याशी वाचक जोडला जातो. हेच मानवी मूल्यभान, वैश्विक जाणीवा या सर्व साहित्यिकांच्या साहित्यामधून प्रतिबिंबित होताना दिसते. जागतिकीकरणानंतर आलेली अमानुषता, जगण्यातली विषमता, नव-आर्थिक चातुर्वर्ण्य व्यवस्था, जल, जमीन, जंगल यांच्यासंदर्भातील पर्यावरणीय अनास्था यांचा वेध घेताना आणि त्यांवर प्रहार करतानाच मानवतावादाचा उद्घोष हे साहित्यिक करतात. आजच्या काळाचे विधान या साहित्यकृतींमध्ये प्रकर्षाने जाणवते. तरीही निराशावादाचा सूर न ओढता आशेच्या बळावर चालत राहण्याचे भानही ते जपतात, अशा शब्दांत देशमुख यांनी सर्वच साहित्यकृतींचे यथायोग्य मूल्यमापन केले.

डॉ. राजन गवस
डॉ. राजन गवस म्हणाले, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या साहित्यिकांनी केलेले लेखन हे ताजे, टवटवीत आणि कसदार आहे. दीर्घचिंतनाचा अवकाश आणि आस्थेचा पैस यांचे भान जपल्याने त्यांच्या साहित्यकृतींचे साहित्यमूल्य अधिक अधोरेखित झाले आहे. लेखक भ्रष्ट झाला की तो लेखक म्हणून संपतो. त्याच्या लेखनातूनच ते आपोआप जाणवू लागते आणि त्यामुळे त्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गी लागते. लेखक हा नेहमी व्यवस्थेचा विरोधक असतो, असावा कारण व्यवस्थेच्या दोषांवर बोट ठेवणं हेच त्याचे खरे काम असते. त्यामुळे लेखन ही खूप गांभीर्याने करण्याची बाब आहे. तटस्थ आणि व्रतस्थ राहण्याची जबाबदारी लेखकावर असते, याचे भान कधीही हरपू देता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आजच्या परिप्रेक्ष्यात श्रमिक, शोषित, दलित, वंचित, महिला यांच्या प्रश्नांनी नवे स्वरुप धारण केले आहे. युवा पिढीला त्यांच्यासमोरील प्रश्नांचा वेध घेऊन दिशा दाखविणाऱ्यांची गरज आहे. समाजाच्या एकूणच अस्तित्वासंदर्भातील अनेक समस्यांनी भोवताल ग्रस्त आहे. या सर्वांना सामावून घेणारे, त्यांना दिशा दाखविणारे सकस साहित्य निर्माण होणे ही फार गरजेची गोष्ट आहे. त्या दृष्टीने असे साहित्य निर्माण करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या आणि निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या प्रत्येक लेखकाला प्रोत्साहित करण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे मोल मोठे आहे. इथे उपस्थित असणारा प्रत्येक साहित्यिक त्यासाठी सक्षम आहे, म्हणूनच या देशातल्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना प्रोत्साहित केले आहे. या पुढील काळातही त्यांच्या हातून अशाच प्रकारची साहित्यसेवा होत राहावी. समाजाला भान देण्याचे, सामाजिक जाणीवांचे हे भान कायम राखण्याचे काम हे त्यांच्या साहित्यकृतींतून करीत राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सर्व सत्कारमूर्तींनीही आपले मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. यावेळी डॉ. प्रकाश पवार, जयसिंग पाटील, यांच्यासह शिक्षक, साहित्य रसिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण गुरव लंबी रेस का घोडा’ : डॉ. राजन गवस

किरण गुरव यांचा सत्कार करताना डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. राजन गवस यांच्यासह मान्यवर.
जुगाड या कादंबरीमुळे चर्चेत आलेले साहित्यिक किरण गुरव हे मराठी साहित्य क्षेत्रातील लंबी रेस का घोडा आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी काढले. डॉ. गवस म्हणाले, शिवाजी विद्यापीठात प्रशासकीय जबाबदारी सांभाळत किरण गुरव यांनी आपली साहित्यिक वाटचाल केली आहे. त्यांच्या श्रीलिपी, राखीव सावल्यांचा खेळ आणि बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कथासंग्रहांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी धूम माजवली. जागतिकीकरणानंतर भोवतालातील घडामोडी अत्यंत चिकित्सकपणे टिपून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उमटल्याचे दिसते. जुगाड या पहिल्या कादंबरीनेही त्यांच्याकडून अपेक्षा वाढविल्या आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात व्यंकटेश माडगूळकरांसारखी दमदार कामगिरी करण्याची क्षमता असलेला मराठीतला हा एक महत्त्वाचा साहित्यिक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment