Tuesday, 13 August 2019

शिवाजी विद्यापीठाकडून १५ ऑगस्टपासून कोल्हापूर शहर-जिल्ह्यात व्यापक स्वच्छता मोहीम: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी.


कोल्हापूर, दि. १३ ऑगस्ट: येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी कोल्हापूर शहर स्वच्छतेची व्यापक मोहीम हाती घ्यावी, तसेच पुढील टप्प्यात जिल्हा परिषदेच्या प्राधान्यक्रमानुसार स्थानिक तसेच अन्य विद्यापीठांतील एनएसएस स्वयंसेवकांच्या चमूंनी जिल्ह्यातील विविध आपत्तीग्रस्त गावांत नियोजनबद्ध पद्धतीने जाऊन स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यक्रम अधिकाऱ्यांची बैठक कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय येवा योजनेचे सेवा हे ब्रीद लक्षात घेऊन संपूर्ण मोहिमेचे नियोजन करावे. तत्पूर्वी, उद्या (दि. १४) शहरातील पूरबाधित विभागांची जागेवर जाऊन पाहणी करावी. त्यातून त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, सामुग्री आणि शासकीय स्तरावरील सहकार्य यांचा त्यांना अंदाज येईल. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष मोहिमेचे नियोजन करावे. त्यातही स्वच्छतेचे स्वरुप प्रथम ठरवावे लागेल. हातमोजे, गमबूट, मास्क इत्यादी साहित्य आवश्यक आहेच, पण, त्याशिवाय सुद्धा शासकीय यंत्रणेचे कुठे सहकार्य लागेल, या संदर्भात त्यांनाही आधीच अवगत करा. स्वच्छता मोहिमा राबवित असताना शासकीय यंत्रणेशी समन्वय राखूनच काम करावे. प्रत्येक महाविद्यालयाने आपापल्या शेजारच्या आपत्तीग्रस्त विभागात स्वच्छता मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासही सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपत्ती काळात विद्यापीठाने केलेल्या कामाचीही माहिती दिली. ते म्हणाले, विद्यापीठाने गेल्या सहा दिवसांत कॅम्पसवर शिव सहायता व आपत्ती निवारण केंद्र चालविले. यामध्ये तीनशेहून अधिक बाधित नागरिकांना आसरा देण्यात आला. अगदी बसस्थानकावर अडकून पडलेल्या पूरग्रस्तांचीही येथे सोय करण्यात आली. अनेक ठिकाणी लोकांना अन्नपदार्थ होते, पण जनावरांना चारा मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या कॅम्पसवरील गवत पाठवून जनावरांसाठी चारा-वैरणीची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे विद्यापीठाने शहरातील नागरिकांची दररोज सुमारे दोन लाख लीटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली.
दरम्यान, नागरिकांनी यापुढील काळात काही वस्तूरुपी मदत द्यावयाची असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे जमा कराव्यात, त्याचप्रमाणे आर्थिक स्वरुपातील मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीकडेच सुपूर्द करावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण क्षमतेचा आढावा घेतला. त्यांच्या बरोबरीने आवश्यक तेथे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि सर्वसामान्य विद्यार्थी यांचीही मदत घेण्याबाबतचा निर्णय कार्यक्रम अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे आवाहन केले.
विद्यापीठाचे एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वच्छता अभियान सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध रितीने राबवावे, असे आवाहन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment