Saturday 26 June 2021

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गानेच राष्ट्रीय एकात्मता जोपासणे शक्य: डॉ. जयसिंगराव पवार

 

शिवाजी विद्यापीठातर्फे शाहू जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात 'राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार


शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. अवनिश पाटील डॉ. आर.व्ही. गुरव आदी.

शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू संशोधन केंद्रात शाहू जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. अवनिश पाटील डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. देविकाराणी पाटील आदी.


राजर्षी शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. अशोक चौसाळकर, शाहीर आझाद नायकवडी आदी.


कोल्हापूर, दि. २६ जून: राष्ट्राची एकता, अखंडता, बंधुता जोपासण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरुनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.


डॉ. जयसिंगराव पवार

डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जे राजकीय, सामाजिक योगदान दिले, त्या कार्याची व्याप्ती पाहता, ते खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे, राष्ट्र उभारणीचे कार्य होते, हे जाणवल्याखेरीज राहात नाही. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बांधणीला घटनेच्या साच्यात सुस्वरुप आकार देण्याचे कार्य केले. आज त्या कार्याला आव्हान देण्याचे घातक प्रयत्न होत आहेत. आपले राष्ट्र हे कोण्या एका धर्माचे नसून सर्व धर्मियांचे आहे, अशी समभावाची भावना जोपासली जाणे, वृद्धिंगत होणे ही फार महत्त्वाची बाब आहे. राष्ट्र टिकवायचे असेल तर आपण सर्व धर्मांचे आहोत, ही भावना दृढमूल होणे आवश्यक आहे. भावना भडकावणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहावयाचे असेल, तर स्वतः शहाणे होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. महात्मा फुले यांच्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत बहुजन समाजाच्या हरेक नेतृत्वाने समाजाचा सामूहिक शहाणपणा कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केलेले होते. या सामूहिक शहाणपणाच्या व्याप्तीवरच देशाचे शहाणपण, देशाचा सर्वधर्मसमभाव या गोष्टी अवलंबून असतात.

डॉ. पवार पुढे म्हणाले, लोकशाहीवादी आणि मानवी मूल्यांवरच राष्ट्र ही संकल्पना आधारित आहे. राजकीय स्वातंत्र्य हे त्यातले एक मूल्य आहे. ती एक आवश्यकता आहे, मात्र केवळ तेच म्हणजे राष्ट्र समजणे गैर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला पाऊणशे वर्षे झाली तरी अद्यापही आपल्यातला भेदभाव, अज्ञान, परस्परांमधला कटुताभाव दूर होऊ शकलेला नाही. परस्परद्वेषाच्या पायावर कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही. आपल्यातले भेद जितक्या लवकर दूर होतील, तितके एक राष्ट्र म्हणून आपण मजबूत होऊ. हा राष्ट्र मजबुतीचा विषय आपल्या राष्ट्रपुरूषांच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा सर्वाधिक महत्त्वाचा विषय होता, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्या दृष्टीने आपण एक राष्ट्र होण्याकडे वाटचाल करणे ही आजची खरी गरज आहे.


कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार हा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा पाया होता. प्रत्येक घटकासाठी त्यांनी दूरगामी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आपल्याला दिसते. केवळ शिक्षणाच्या बाबतीत जरी विचार केला तरी सुद्धा शंभर वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणाऱ्या आणि त्याचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडणाऱ्या या लोकराजाच्या द्रष्टेपणाचे आश्चर्य आणि कौतुक वाटल्याखेरीज राहात नाही. आपल्या धोरणांचे लाभ केवळ आपल्या संस्थानापुरतेच मर्यादित न राखता संस्थानाबाहेरील शिक्षण संस्था, वसतिगृहे यांना भरीव स्वरुपाचा निधी मदत स्वरुपात महाराज पाठवित असत. शाहू महाराजांचा परीसस्पर्श झाला नाही, असे कोणतेही क्षेत्र नाही. कला, संगीत, शेती, सहकार, जलसिंचन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे राष्ट्रनिर्मितीचेच कार्य आहे.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्याचप्रमाणे राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एन.बी. गायकवाड, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. अवनिश पाटील, डॉ. देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळास भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्याचप्रमाणे दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, शाहीर आझाद नायकवडी आदी उपस्थित होते.

  

No comments:

Post a Comment