Sunday, 6 June 2021

शिवस्वराज्य दिन विशेष व्याख्यान:

भूमीपुत्रांच्या कल्याणासाठीच शिवरायांकडून स्वराज्याची स्थापना: इंद्रजीत सावंत

 

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत.

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत.

कोल्हापूर, दि. ६ जून: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातींत विखुरलेल्या एतद्देशीय भूमीपुत्रांची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी केलेली होती. स्वातंत्र्य व सहिष्णुता या मूल्यांवर महाराजांचे स्वराज्य अधिष्ठित होते, असे प्रतिपादन प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आज येथे केले.

शिव स्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिव-वार्तायुट्यूब वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

श्री. सावंत म्हणाले, रयतेची काळजी वाहणारा शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा जगाच्या पाठीवर झाला नाही. म्हणूनच त्यांना राष्ट्रनिर्माता म्हटले जाते. रयतेच्या शेतातील काडीसही हात लावू नका, अन्यथा तुमच्यापेक्षा मोंगल बरे, अशी भावना निर्माण होईल, असे आपल्या सैन्यास बजावतानाच पिचलेल्या शेतकऱ्यांना हरतऱ्हेने मदत करण्याचे धोरणही महाराजांनी राबविले. अवर्षण स्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन द्या, पेरण्यासाठी बीज द्या, नांगरण्यासाठी बैल द्या, पीक उगवेपर्यंत त्यांना पोटापाण्यासाठी धान्य द्या आणि परतवसुली बिनव्याजी करा, असे महाराजांनी आपल्या सुभेदारांना आदेश दिल्याची पत्रे आहेत. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर गडकोट, किल्ले, दुर्ग बांधणारे अनेक राजे आहेत, मात्र, परचक्राच्या कालखंडात प्रजेला आसरा देण्यासाठी त्या किल्ल्यांचा वापर करणारा शिवाजी महाराजांसारखा अन्य राजा होणे नाही. म्हणूनच आजही भूमीपुत्रांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदरभाव कमालीचा ओसंडून वाहतो.

श्री. सावंत म्हणाले, भाषेचे सांस्कृतिक व्यवहारातील महत्त्व आणि परकीय भाषेद्वारे येणारी सांस्कृतिक गुलामगिरी या गोष्टी जाणून जाणून आपल्या कारभारात, पत्रव्यवहारात मराठी भाषेचा वापर, परकीय शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचे उपयोजन या काही ठळक बाबी महाराजांनी जाणीवपूर्वक केल्या. राजव्यवहार कोषाची निर्मिती त्यासाठी केली. त्यामध्ये एतद्देशीयांच्या बोलीमधील शब्दांचा परकीय शब्दांना पर्याय म्हणून समावेश केला. आपल्या संपूर्ण व्यवहारांत त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली. ही इथल्या भूमीपुत्रांच्या सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करणारी फार मोठी गोष्ट महाराजांनी केल्याचे आज लक्षात येते.

शकनिर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली एक फार महत्त्वाची बाब असल्याचे सांगून श्री. सावंत म्हणाले, शालिवाहनानंतर शकनिर्मिती करणारे शिवाजी महाराज एकमेव शककर्ते ठरले. राज्याभिषेकाच्या दिवसापासून त्यांनी या श्री राज्याभिषेक शकाची सुरवात केली. पुढे आपल्या पत्रव्यवहारांतून, आज्ञापत्रांतून आणि प्रत्येक कागदपत्रामधून हा शक त्यांनी सर्वदूर प्रसारित केला. पुढे सुमारे दीडशे वर्षे हा शक अंमलात राहिला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, महाराजांचे चरित्र अनेक सुरस घटनांनी समृद्ध आहे. तत्कालीन राजकीय गरजेतून त्यांना काही धाडसी पावले उचलावी लागली. या घटनांनी महाराजांच्या जीवनचरित्राला एक वेगळेच क्षात्रतेज प्रदान केले. या घटना वीररसाने भारलेल्या असल्याने सर्वसामान्य जनतेला भारावून टाकणाऱ्या ठरल्या. आहेत. मात्र, शिवरायांनी ज्या पद्धतीने रयतेची काळजी वाहिली आणि सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण केले, ते अढळस्थानच शिवरायांचे खरे सिंहासन ठरले. महाराजांना `जाणता राजा' म्हटले गेले कारण ते खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्य रयतेचे राजे होते. शिवरायांनी या देशात सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले. इथल्या गोरगरीबांपासून ते सरदार दरकदारांपर्यंत प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव आणि अस्तित्व प्राप्त करून देण्याची भूमिका त्यामागे होती. समाजातल्या सर्व स्तरांतील नागरिकांना विश्वासात घेऊन सामाजिक न्यायाची प्रस्थापना हा खरे तर शिवरायांच्या स्वराज्याचा मूलभूत पाया आणि संकल्पना होती. धार्मिक सहिष्णुता, रयतेप्रती कळवळा, कर्तव्यकठोर पण सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी असणारी प्रशासकीय व्यवस्था, प्रजेसाठी धनधान्य वाटपापासून ते जलव्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टींची काळजी वाहणारी महसुली व्यवस्था ही शिवरायांच्या स्वराज्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. म्हणूनच शिवरायांची स्वराज्याची संकल्पना म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून लोकशाही प्रस्थापना अशीच होती.

शिवाजी विद्यापीठ महाराजांचा वारसा कसोशीने जोपासण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बहुजनांच्या घरोघरी शिक्षणाच्या ज्ञानगंगेचा प्रवाह घेऊन जाण्याचे आणि या कार्याला व्यापक स्वरुप प्राप्त करून देण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांना सामाजिक, शैक्षणिक न्याय प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ अखंडित कार्यरत आहे.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला.



भव्य शिवपुतळ्यास अभिवादन



शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास आज सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षकांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, रोजगार व उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. ए.एम. सरवदे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले.


No comments:

Post a Comment