Friday, 18 June 2021

राष्ट्रीय सेवा योजनेचे कोरोना काळातील

कार्य अभिमानास्पद: अजयकुमार बन्सल

 

 

अजयकुमार बन्सल


कोल्हापूर, दि. १८ जून: राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन पातळीवर कार्यरत असलेल्या संघटनेचे सामाजिक कार्य गौरवास्पद स्वरुपाचे आहे. शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना  सध्या या परंपरेला अनुसरूनच कोरोनविरुद्धच्या लढाईत अत्यंत सक्रियपणे योगदान देत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी काल सायंकाळी येथे केले. शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे आयोजित माझं गाव, कोरोनामुक्त गाव अभियानाअंतर्गत वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने माझं गाव, कोरोनामुक्त गाव हे अभियान  सातारा जिल्ह्यात १४० गावांत सुरू  आहे. या अनुषंगाने कोरोना योद्धा समिती, ग्रामस्थ स्वयंसेवक- स्वयंसेविका यांना मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित केले जात आहे. याअंतर्गत सदर वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील अध्यक्षस्थानी होते.

अजयकुमार बन्सल म्हणाले की, सातारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्त होण्याकडे असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये. आपल्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे या कोरोनाच्या युद्धात एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांची भूमिका मोलाची आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यासाठी घेतलेला पुढाकार व प्रोत्साहन मौलिक आहे.

यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहितीही कोविड योद्ध्यांना सांगितली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, कोरोना महामारीने देशाच्या सीमेच्या मर्यादा पार केल्या आहेत. आज असा एकही देश नाही की ज्या देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केले नाही. भारतात दुसऱ्या लाटेत कोरोनाने खूप हानी पोहोचवली आहे. अशा स्थितीत जनजागृती, समुपदेशनातून मानसिक आधार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन याची गरज ओळखून शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून गावपातळीवरील कार्याची जबाबदारी घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने विद्यापीठाचे स्वयंसेवक काम करीत आहेत, याचा अभिमान वाटतो.

कोरोना काळात पोलीस दलाने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून श्री. बन्सल यांना त्यांनी धन्यवादही दिले. यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेव योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांनी प्रास्ताविक केले तर शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले. आनंद घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास  महाविद्यालयातील  कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ ऑनलाइन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment