Friday, 27 November 2020

‘शहीद संग्राम पाटील यांच्या कार्याचा विद्यापीठास अभिमान’

 

शहीद संग्राम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: निगवे खालसा (ता. करवीर) येथील शहीद संग्राम पाटील यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या कार्याचा शिवाजी विद्यापीठ परिवारास अभिमान आहे. त्यांच्या हौतात्म्यामुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखात विद्यापीठ परिवार सहभागी आहे, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आणि पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.

शहीद दिनाच्या संध्येला (दि. २६ नोव्हेंबर) कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासमवेत शहीद संग्राम पाटील यांचे वडील शिवाजी रामचंद्र पाटील यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शिवाजी विद्यापीठातर्फे शहीद लष्करी, निमलष्करी जवान आणि शहीद पोलीस यांच्या अपत्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठ अधिविभाग अथवा संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पाटील कुटुंबियास आश्वस्त केले.

No comments:

Post a Comment