Wednesday, 18 November 2020

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन साधेपणाने; पण उत्साहात

संशोधन क्षेत्रातील विद्यापीठाचा लौकिक उंचावण्यासाठी योगदान द्यावे

- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचे आवाहन

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचा विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन शुभसंदेश (व्हिडिओ)



शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्व उपस्थितांना अभिवादन करून शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व अन्य मान्यवर.


कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: संशोधनाच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आपला झेंडा जागतिक पातळीवर फडकविला आहे. विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रातील लौकिक अधिक उंचावण्यासाठी संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्वोतोपरी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन आज कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रांगणात सकाळी ठीक साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कुलगुरू डॉ. शिर्के व मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिवपुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर युट्यूबद्वारे ऑनलाईन स्वरुपात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्वांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या सर्वच समाजघटकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, कोविड-१९चे धोके टाळण्यासाठी विद्यापीठाने साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांविना साजरा होणारा हा वर्धापन दिन वेगळा आहे. कोविड-१९ने आपल्यातल्या क्षमता व मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. विशेषतः ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत. या ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रणालीपासून सुटका होऊन प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेस लवकरात लवकर सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांबरहुकूमच आपल्याला टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवावयाची आहे. या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ व महाविद्यालये विविध उपक्रम घेऊन सामोरे येतील, ज्यायोगे शिकणे व शिकवणे अधिक सुलभ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सदर कार्यक्रमानंतर शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता (https://www.youtube.com/c/ShivVarta/) या युट्यूब चॅनलचे लोकार्पण कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते त्यांच्या दालनामध्ये करण्यात आले.

वर्धापन दिन कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.आर. शेवाळे, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांच्यासह अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित शारीरिक अंतरासह योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

विद्युत रोषणाईने झगमगले विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्य प्रशासकीय इमारत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा असणारा उद्यान परिसर याठिकाणी अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दीपावली आणि वर्धापन दिन असा योग या निमित्ताने जुळून आला. सध्या कोविड-१९मुळे विद्यापीठ परिसरात अभ्यागतांना प्रवेश करता येत नसला तरी मुख्य इमारतीसमोरून या रोषणाईचे नेत्रसुखद दर्शन नागरिकांनी रात्री घेतले.








 

No comments:

Post a Comment