कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर: विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी
क्रीडा जगतात विद्यापीठाचा लौकिक उंचावण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात
सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासाठी देण्यात येणारा क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर
पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. येथील न्यू कॉलेजने यंदा सलग चौथ्यांदा हा
पुरस्कार पटकाविला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, महाविद्यालयाने सलग चार
वर्षे हा चषक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे, ही कौतुकाची बाब आहे. त्यामध्ये
महाविद्यालयातील सर्व घटकांसह क्रीडापटूंनी घेतलेली मेहनत दिसून येते. खेळण्याचे
अनेक फायदे आणि आयाम आहेत. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला
तंदुरुस्त राखण्याकडे लक्ष पुरविले आहे. खेळांमुळे व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो,
हे खरेच आहे. त्याचबरोबर देशप्रेमाची प्रचिती आणून देण्याची व देशाला एका धाग्यात
गुंफण्याची ताकद खेळांत आहे. संघबांधणीचे बाळकडू व नेतृत्व विकास हे त्याचे अधिकचे
फायदे आहेत. त्याचप्रमाणे आव्हाने स्वीकारण्याची व त्यांचे रुपांतर पुरस्कारांत
करण्याची मोठी संधी क्रीडापटूंना असते. मिळालेल्या यसावर समाधानी न राहता अधिक
मोठ्या यशासाठी सदैव तहानलेले असणे, हे सच्च्या खेळाडूचे लक्षण आहे. त्या दृष्टीने
प्रत्येक खेळाडूने मोठे ध्येय बाळगून कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते न्यू
कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्यासह निवडक क्रीडापटूंना या
पुरस्काराप्रित्यर्थ देण्यात येणारा फिरता चषक प्रदान करण्यात आला. यावेळी कुलसचिव
डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य
डॉ. ए.एम. शेख, शारीरिक शिक्षण संचालक अमर सासणे, प्रशिक्षक सुचय खोपडे यांच्यासह
खेळाडू उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत
कार्यक्रम घेण्यात आला.
No comments:
Post a Comment