Saturday, 17 March 2018

संशोधनाच्या क्षेत्रात अकृषी राज्य विद्यापीठांत

शिवाजी विद्यापीठ देशात अग्रस्थानी




मटेरियल सायन्समधील संशोधनातील राष्ट्रीय आघाडी कायम;
भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी संशोधनातही प्रथम

कोल्हापूर, दि. १७ मार्च: शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील अकृषी राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान प्राप्त केले आहे. आघाडीच्या टॉप-१० संशोधन संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विद्यापीठ देशात आठवे आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने मटेरियल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. करन्ट सायन्स या जागतिक आघाडीच्या ताज्या अंकात ही क्रमवारी जाहीर झाली आहे.
विद्यापीठाच्या ५४व्या दीक्षान्य समारंभाच्या पार्श्वभूमीवर, संशोधनाच्या क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठाचे देशातील अग्रस्थान या निमित्ताने पुनश्च अधोरेखित झाले आहे.
करन्ट सायन्सच्या दि. २५ फेब्रुवारी २०१८च्या अंकात रिसर्च आऊटपुट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूशन्स ड्युरिंग २०११-१६: क्वालिटी अॅन्ड क्वांटिटी परस्पेक्टिव्ह हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये जागतिक संशोधनाचा दर्जा निश्चित करणाऱ्या साय-व्हॅल निर्देशांकाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. सरासरी राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा ज्या संशोधन संस्थांचे निर्देशांक अधिक आहेत, अशा सात विद्याशाखांचा दर्जात्मक अभ्यास या लेखात करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र व खगोल, रसायनशास्त्र, बीजीएम अर्थात बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स व मॉलेक्युलर बायोलॉजी आणि मटेरियल सायन्स यांचा समावेश आहे.
सन २०११ ते २०१६ या कालावधीत वर्षाला ३००हून अधिक शोधनिबंधांचे प्रकाशन आणि राष्ट्रीय सरासरी (९ टक्के) पेक्षा टॉप-१० पर्सेंटाईल आऊटपुट या निकषांवर देशातील आघाडीच्या संशोधन संस्थांची क्रमवारी लेखात देण्यात आली आहे. यामध्ये इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकता ही संस्था २८९८ प्रकाशने व २६.३ पर्सेंटाईलसह प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत शिवाजी विद्यापीठ १९२८ प्रकाशने व २०.४ पर्सेटाईलसह देशात आठव्या आणि अकृषी विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे. मुंबई विद्यापीठ ३८२८ प्रकाशने व १५.६ पर्सेंटाईलसह बाराव्या स्थानी आहे.
त्याखेरीज, या संशोधन संस्थांचे फिल्ड वेट सायटेशन निर्देशांक (एफ.डब्ल्यू.सी.आय.) यावर आधारित विषयनिहाय विश्लेषण करण्यात आले असून त्यामध्ये मटेरियल सायन्स, भैतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण यादीत तिसऱ्या तर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मटेरियल सायन्समध्ये सर्वसाधारण जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगलोर प्रथम स्थानी, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकता द्वितिय स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या व अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे.
भौतिकशास्त्र व खगोल विषयात पंजाब विद्यापीठ, चंदीगड पहिल्या स्थानी, विश्वभारती विद्यापीठ, कोलकता दुसऱ्या स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, अभियांत्रिकी विषयात साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, कोलकता प्रथम स्थानी, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगलोर द्वितिय स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तृतीय व अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे.

संशोधनाच्या दर्जावर शिक्कामोर्तब: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
Dr. Devanand Shinde
यापूर्वीही, सन २०१६मध्ये करन्ट सायन्सच्या सर्वेक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स विषयातील संशोधनात अकृषी राज्य विद्यापीठांत देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले होते. आणि आता सन २०११ ते २०१६ या कालावधीतील संशोधनावर आधारित जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाच्या क्षेत्रातील दर्जा व गुणवत्तेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यापीठातील संशोधकांचे शोधनिबंध जागतिक स्तरावरील संशोधकांकडून अभ्यासले जातात, विविध शोधनिबंधांमधून त्यांच्या शोधनिबंधांचे साइटेशन्स मोठ्या प्रमाणावर दिले जातात, ही अभिमानास्पद बाब आहे. अकृषी विद्यापीठांत देशात आणि राज्यातही प्रथम स्थान मिळवून शिवाजी विद्यापीठाने संशोधनाची संख्या व गुणवत्ता या दोन्ही बाबतीत संतुलन सांभाळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मटेरिअल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या विषयांमधील संशोधनात राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण यादीत तिसरे व अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान पटकावून या क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि संशोधक विद्यार्थी हे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment