Tuesday, 6 March 2018

सहकारी चळवळ सामाजिक विकासाला आग्रक्रम देणारी: लक्ष्मीकांत देशमुख


माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख 


कोल्हापूर, दि. 5 मार्च - सहकारी चळवळ ही विकास साध्य करणारी आणि सामाजिक विकासाला आग्रक्रम देणारी आहे. सहकारी चळवळ माणसाच्या माणुसकीला आणि नैतिकतेला आवाहन करणारी भारतीय परंपरेला धरुन चालणारी व्यापक चळवळ आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागामार्फत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व्याख्यानमालेअंतर्गत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचे 'सहकारी चळवळीचे भवितव्य' या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून   माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते. तसेच, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते येथील प्राचार्य डॉ.चंद्रकांत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, माणसांमधील संघर्ष वाढला तर माणसांचे जीवनक्रम उच्च होवू शकत नाही. म्हणून, माणसांनी एकमेकांना धरुन राहिले पाहिजे, हाच सहकाराचा मूळ गाभा आहे. स्वखुशीची एकजुट हा सहकाराचा मूळमंत्र आहे. ही एकमेकांना मदत करणारी सहकारी चळवळ आहे. सहकारी चळवळीचा पाया हा नैतिकतेवर आधारीत असला पाहिजे, असे 1971 साली मुंबई प्रांतामध्ये सहकार परिषदेमध्ये, महात्मा गांधी म्हणाले होते.  1904 साली सहकारी सोसायटी अधिनियम आला त्यानंतर दहा वर्षांनी महात्मा गांधीनीं सहकारी चळवळीला नैतिक आणि व्यापक असे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून आपसामध्ये स्पर्धा करता काम केले पाहिजे.  समुदायाची, समाजाची काळजी केली पाहिजे त्यांचे हित साधले पाहिजे. खाजगीक्षेत्राप्रमाणे अमर्याद नफा कमावणारे होता सहकार चळवळ संपूर्ण देशाने स्विकारली पाहिजे, त्यासाठी मोठे धोरण आखले पाहिजे. मानवी समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी ही चळवळ पुढे नेहली पाहिजे. सहकारी चळवळीची सुरुवात आठराव्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये झाली. समन्यायी वाटपाने चालणारी ही पहिली संस्था होती. आठराव्या शतकामध्ये त्याठिकाणी खुप गरिबी होती. खऱ्या अर्थाने लोकशाही चळवळीची ती सुरुवात होती. सावकारांपासून सुटका व्हावी म्हणून इंग्रजांनी 1904 साली सहकारी पतसंस्था कायदा सहमत केला. शेतकऱ्यांना नियमित पतपुरवठा करण्यासाठी एक संस्था उभी करावी म्हणून याचा विचार झाला. 2014 मध्ये कोल्हापूरमध्ये या चळवळीचा शतकमहोत्सव साजरा झाला. सहकारी चळवळीच्या माध्यमातून गुजरातच्या अमूलने देशामध्ये फार मोठी प्रगती साध्य केली आहे. समुदायाच्या विकासासाठी सहकारी चळवळ महत्वाची आहे. सहकारामध्ये, पैशाचे मूल्य वाढत गेले आणि माणसाचे मूल्य कमी होत गेले.  अशा वेळेस सहकारामध्ये भ्रष्टाचार मोठया प्रमाणात होत गेला.  गेल्या दहा वर्षांमध्ये 35 सहकारी साखर कारखाने विकली गेली. सहकारामध्ये राजकारण शिरले आणि भ्रष्टाचाराचे केंद्र बनले.  त्यामुळे निम्मे कारखाने बंद पडले. अशा वेळेस खाजगीकरण उदयास आले. खाजगीकरणाने सहकाराचे तत्व सोडले नाही. सहकारी चळवळीने ग्रामीण विकासाला खुप मोठी चालना दिलेली आहे. राज्याने सहकार चळवळीच्या माध्यमातून खुप मोठी प्रगती साधलेली आहे. आता, तीच बदनाम झालेली आहे. राज्यातील सहकाराची अवस्था वेळीच सुधारली पाहिजे.

सरकारचा हस्तक्षेप किंवा सहकार्य घेता सहकारी चळवळ पुढे जावू शकते. यासाठी आंध्रप्रदेशमधील लोकांनी प्रयत्न चालू केले आहेत. त्याचा आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. सरकारला बाजूला करुन भारतातील 9 राज्यांमध्ये 'म्युच्युअली एेडेड को-ऑपरेटीव्ह सोसायटी' ॲक्ट हा कायदा कार्यरत झाला आहे. सहकारामधील राजकारण दूर होवून व्यावसायिक वर्गीकरण आणले पाहिजे. यासाठी खुप परिश्रमपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. सबसिडी आणि राजकारण बंद केले तर सहकारी चळवळ चांगली चालेले. आजही, काही सहकारी संस्था समाजाचे भले करण्यासाठी कार्यरत आहेत.
आज, सहकारी चळवळ एका महत्वाच्या वळणावर येवून पोहचलेली आहे. सहकाराबाबत गेली पंचवीस वर्षे जे आर्थिेक धोरण स्विकारले आहे त्याचा हा परिपाक आहे.  भारताच्या आर्थिक, सामाजिक विकासामध्ये ती अधिक जोमाने पुढे जाईल की कोमेजून जाईल असा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून पडत आहे. जागतिकीकरण, उदात्तीकरण, खाजगीकरण यांचा स्विकार केल्यानंतर सहकारी चळवळीचे महत्व कमी होईल की काय असा प्रश्न होता. 1950 ते 1970 या कालावधीत मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी चळवळ खुप जोमाने वाढत गेली. 1970 नंतर जगामध्ये उदात्तीकरणाचे वारे वाहत होते तर 1970 ते 90 या कालावधीमध्ये विकास होत होता. 1991 साली देशाला आपले सोने गहाण ठेवावे लागले होते. त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहाराव यांनी जागतिकीकरणाचा स्विकार केला.  या पंचवीस वर्षांमध्ये जागतिकीकरणाची खुप मोठी प्रगती झालेली आहे. सर्व व्यवस्थेमध्ये सहकाराचे एक महत्वाचे स्थान आहे. मधल्या काळात बदलते जग असले तरी सहकार चळवळ टिकून राहिलेले आहे. आज, राज्यकर्त्यांमुळे, बाजाराची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे याकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे. खाजगीकरण आणि सार्वजनिक संस्था या दोन्ही अर्थ प्रणाली जगामध्ये प्रचलित आहेत. या पलीकडे जावून मानवी स्वभावाचा विचार करुन जास्तीत जास्त लोकांचे विकास करण्यासाठी सहकाराचा विकास झालेला आहे.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, जे सगळे होते ते माझयासाठी आणि मी जे करतो तेही माझयासाठीच यामुळे सहकारी चळवळीला उतार लागला आहे. तरीही काही सहकारी संस्था चांगले काम करीत आहेत. सहकारी संस्थेकडे व्यक्तीगत म्हणून पहाता युनिक म्हणून पहावे. सहकारी चळवळ चांगल्या पध्दतीने चालण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांची आणि तरुण पिढींची ही महत्वाची जबाबदारी आहे.

यावेळी नातेपुतेहून आलेले सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या समवेत कार्य केलेले बी.डी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी.एस.कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायय प्राध्यापक एस.टी.कोंबडे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी विविध अधिविभागातील प्राध्यापक, विद्याथी, विद्यार्थींनी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
------

No comments:

Post a Comment