Dr. P.P. Wadgaonkar |
कोल्हापूर, दि. २८
फेब्रुवारी: विज्ञान अधिक लोकप्रिय, लोकाभिमुख होण्यासाठी मराठीमध्ये विपुल प्रमाणात
वैज्ञानिक साहित्याची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने डॉ. व्ही.एन.
शिंदे यांचे ‘असे घडले भारतीय वैज्ञानिक’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी आज
येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित
करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पारितोषिक वितरण व पुस्तक प्रकाशन अशा संयुक्त
समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
होते.
डॉ. वडगावकर
म्हणाले, विज्ञानविषयक जनजागृती करण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज
आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागे खरे प्रयोजन ते आहे. त्यामुळे आज डॉ.
शिंदे यांचे भारतीय शास्त्रज्ञांची अत्यंत सुलभ भाषेत ओळख करून देणारे पुस्तक
प्रकाशित होते आहे, ही अत्यंत समयोचित बाब आहे. एकविसाव्या शतकात विज्ञानवादाच्या
प्रसारासाठी अशा प्रकारे व्यापक चळवळ करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनीही नवनवीन
संशोधने करून ती प्रकाशित करण्यास प्राधान्य द्यायला हवे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा
सर्वत्र आदर होतो, हे लक्षात ठेवून ज्ञानार्जनास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही
त्यांनी केले.
Dr. D.T. Shirke |
अध्यक्षीय भाषणात
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आपल्या प्रशासकीय
जबाबदाऱ्या सांभाळत अत्यंत जाणीवपूर्वक विज्ञान व पर्यावरणविषयक जनजागृतीचे काम
हाती घेतले आहे. त्या कामातून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या
देशातल्याच परंतु अद्यापही आपल्याला माहिती नसलेल्या शास्त्रज्ञांचा नव्याने परिचय
करून देण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत
कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही त्यांच्या हातून अशी विज्ञानसेवा घडत राहावी, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उप-कुलसचिव
डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी पुस्तकाविषयी माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॉ. वडगावकर यांच्या हस्ते विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील
विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. रसायनशास्त्र अधिविभागाचे
प्रमुख डॉ. जी.एस. गोकावी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जी.बी. कोळेकर
यांनी आभार मानले.
‘असे घडले भारतीय शास्त्रज्ञ’ या पुस्तकाविषयी...
शिवाजी विद्यापीठाचे
उप-कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी ‘असे घडले भारतीय शास्त्रज्ञ’ हे पुस्तक लिहीले असून या पुस्तकात त्यांनी
जगदीशचंद्र बोस यांच्यापासून ते डॉ. वसंत गोवारीकर यांच्यापर्यंत सुमारे ३१ भारतीय
शास्त्रज्ञांच्या जीवन व कार्याचा अत्यंत सुलभ व ओघवत्या शैलीत परिचय करून दिला
आहे. कोल्हापूर आकाशवाणीसाठी त्यांनी या शास्त्रज्ञांविषयी मालिका लिहीली होती.
त्याचे विस्तृत रुप म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकाला कोल्हापूर आकाशवाणीचे अधिकारी
श्रीपाद कहाळेकर यांची अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. कोल्हापूरच्या
अक्षर-दालन प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment